लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई; तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं पूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

आज लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

News Photo   2026 07 22T174440.699

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी दिल्लीत (Delhi) आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली असून संसदेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना धक्का दिला.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. अनेकदा ते सरकारवर बेधडक टीका करताना दिसतात. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल त्यांनी मागे एकदा केली होती. चालू अधिवेशनात कल्याण बॅनर्जी यांनी एका महिला खासदाराबद्दल अपशब्द वापरले, असा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सदस्यत्व पावसाळी अधिवेशनापुरते रद्द करण्यात आले आहे.

आज लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर कल्याण बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या महिला खासदारांमध्ये बाचाबाची झाली. सध्या एनसीपीआय पक्षात असलेल्या मिताली बाघ, शताब्दी रॉय आणि काकोली घोष दस्तीदार यांच्याशी त्यांचा वाद झाला.

वादाची पार्श्वभूमी काय?

४ मे रोजी पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल लागला. ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपाने मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली. त्यानंतर बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. पहिल्यांदा ६० आमदारांनी वेगळा गट स्थापन करत तेच तृणमूल काँग्रेस असल्याचे म्हटले. त्यानंतर २० खासदारांनी बंडखोरी करून एनसीपीआय पक्षात विलिनीकरण केले.

मिताली बाघ, शताब्दी रॉय आणि काकोली घोष दस्तीदार या पूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात होत्या. कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळे आज लोकसभा सभागृह तहकूब होताच त्यांनी बंडखोर महिला खासदारांशी वाद घातला.

लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

लोकसभेत बाचाबाची झाल्यानंतर विरोधी पक्षातील काही खासदारांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. यानंतर तीनही महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे जाऊन तक्रार केली. या तक्रारीनंतर जेव्हा २ वाजता लोकसभा सभागृह पुन्हा सुरू झाले, तेव्हा केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला. त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिली.

follow us