Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Elections 2024) मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे समर्थित बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्यासह बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांच्या पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे. या निवडणुकीत मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद (Hafeez Saeed) याचा मुलगाही उभा होता. मात्र, पाकिस्तानी जनतेने दहशतवाद्याच्या मुलाला (Pakistan) पराभूत केले. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद हा लाहोर एनए-122 या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होता. या निवडणुकीत तल्हा सईदचा अतिशय दारुण पराभव झाला.
Pakistan Election : नवाज शरीफांच्या बालेकिल्ल्यात इम्रान समर्थकांची आघाडी; मंत्र्यांची धाकधूक वाढली
या मतदारसंघात इम्रान खान यांच्या पक्षाने समर्थन दिलेला अपक्ष उमेदवार लतीफ खोसा विजयी झाला. त्याला 1 लाख 17 हजार 109 मते मिळाली. नवाज शरीफ यांच्या पक्षाचे उमेदवार ख्वाजा साद ऱफिक यांना 77 हजार 907 मते मिळाली. तर हाफिज सईदच्या मुलाला फक्त 2042 मते मिळाली. विशेष म्हणजे, हाफिज सईदच्या पक्षाने या निवडणुकीत ज्या उमेदवारांना तिकीट दिलं होतं त्यात त्याचे नातेवाईक किंवा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे सदस्यही होते.
हाफिज सईदने पाकिस्तानच्या राजकारणात नशीब आजमावण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली. या निवडणुकीत सईदच्या पक्षाने जवळपास सर्व जागांवर उमेदवार दिले होते. परंतु, या पक्षाचे उमेदवार फार काही करू शकले नाहीत. हाफिज सईद याच्या मुलावरही दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्या उमेदवारीला पाकिस्तानातूनच विरोध झाला होता. मात्र तरीसुद्धा त्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. जनतेने मात्र मतपेटीतून उत्तर देत त्याला पराभवाची धूळ चारली.
Pakistan Election : पाकिस्तानात आज मतदान; ‘वांगी’, ‘सिमकार्ड’ अन् ‘फुगा’ निवडणूक चिन्हांचीच चर्चा