नवी दिल्ली : पाकिस्तानातील मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली. परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे मोठे नुकसान झाले. या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. हल्लेखोराने नमाजाच्या वेळी स्वत:ला बॉम्बने उडवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मशिदीत बॉम्बस्फोट
या बॉम्बस्फोटात दोन पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणाजवळच लष्कराच्या युनिटचे कार्यालय असल्याचे सांगण्यात येत आहे.
आत्मघातकी बॉम्बने स्फोट केला
पेशावरमधील मशिदीत स्फोटाचा आवाज 2 किमी दूरपर्यंत ऐकू आला. पेशावर पोलिस लाइन्समध्ये उपस्थित लोकांनी सांगितले की, स्फोटानंतर आकाशात धुळीचे ढग आणि धुराचे लोट होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोर मशिदीमध्ये नमाज पढत असताना समोरच्या रांगेत उपस्थित होता आणि त्यानंतर त्याने स्वत:ला उडवले.
याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला झाला होता. देशाची राजधानी इस्लामाबादमध्ये फिदाईन हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. याशिवाय अनेक जण जखमी देखील झाले होते.