USA-Iran War : इराणविरुद्धच्या (USA-Iran War) युद्धात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शस्त्राचा वापर केला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. अमेरिकेच्या तब्बल 65 टक्के क्षेपणाशास्त्रामध्ये घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादनाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी क्षेपणास्त्रांच्या तुटवड्याचा दावा फेटाळून लावला आहे. तरीही परिस्थिती अमेरिकेसाठी फारशी अनुकूल नसल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटागॉन) देशातील शस्त्रनिर्मिती कंपन्यांना क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने वाढवण्याचे कठोर आदेश दिले आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे कमी झालेला क्षेपणास्त्रांचा साठा लवकरात लवकर पुन्हा भरून काढणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
नवा दिवस, नवा विक्रम! ‘स्पायडर-मॅन’ भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट
पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी स्पष्ट केले की, संभाव्य धोक्यांनुसार लष्कराला वेगाने शस्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. तरी ती युद्धापूर्वीच आखण्यात आलेल्या मोठ्या धोरणाचा एक भाग आहे.
संरक्षण उद्योगाला पेंटागॉनचे कठोर आदेश
अमेरिकेचे उपसंरक्षणमंत्री स्टीव्ह फेनबर्ग यांनी संरक्षण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले. या पत्रात कंपन्यांना 21 दिवसांच्या आत आपली योजना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेत महत्त्वाच्या शस्त्रांच्या उत्पादनाची क्षमता वाढवणे आणि त्यांची जलदगतीने डिलिव्हरी करण्याचा आराखडा सादर करणे अपेक्षित आहे. पेंटागॉनला लिहिलेल्या पत्रात फेनबर्ग यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, शस्त्रांच्या विकासासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी आता स्वीकारार्ह नाही. देशाची उत्पादन क्षमता तातडीने वाढवण्याची गरज आहे.
इराणसोबतच्या युद्धामुळे क्षेपणास्त्रांच्या साठ्यात मोठी घट
वॉशिंग्टनस्थित थिंक टँक ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ (CSIS) च्या अहवालानुसार, इराणसोबतच्या अलीकडील संघर्षात अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र इंटरसेप्टरचा वापर केला आहे. आकडेवारीनुसार, युद्धापूर्वी अमेरिकेकडे 2,330 पॅट्रियट इंटरसेप्टर होते. एप्रिलमध्ये युद्धविरामाच्या वेळी ही संख्या घटून 1,030 झाली होती. त्यानंतरच्या संघर्षानंतर हा साठा आणखी कमी होऊन 759 ते 827 दरम्यान राहिला आहे. म्हणजेच युद्धापूर्वीच्या तुलनेत अमेरिकेच्या पॅट्रियट इंटरसेप्टरच्या साठ्यात किमान 65 टक्क्यांची घट झाली आहे.
THAAD इंटरसेप्टरची संख्याही जवळपास निम्म्यावर
याचप्रमाणे, युद्धापूर्वी अमेरिकेकडे 452 THAAD इंटरसेप्टर होते. एप्रिलपर्यंत ही संख्या घटून 232 ते 262 दरम्यान आली होती. अमेरिकेने काही प्रमाणात भरपाई करत हा साठा 234 ते 278 पर्यंत वाढवला आहे. तरीही सुरुवातीच्या पातळीच्या तुलनेत हा साठा किमान 38 टक्क्यांनी कमी आहे. CSIS च्या अहवालात इशारा देण्यात आला आहे की, क्षेपणास्त्रांच्या या तुटवड्यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांसमोर हवाई संरक्षणाच्या बाबतीत मोठे धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवाई संरक्षण व्यवस्था भेदण्याची शक्यता वाढू शकते.
CINTAA बरखास्त झाल्याचा दावा चुकीचा’; 68 वर्षांची संस्था अफवांमुळे कमजोर होऊ शकत नाही
ट्रम्प यांचा दावा आणि संरक्षण बजेटवरून काँग्रेसमध्ये संघर्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्षेपणास्त्रांच्या तुटवड्याबाबतचे अहवाल फेटाळून लावले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर दावा केला की, अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा उपलब्ध आहे आणि गरजेनुसार नवीन शस्त्रे तयार करून पाठवली जात आहेत. पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी मंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्राची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, हे पत्र 2028 च्या संरक्षण बजेटच्या प्रस्तावाला आकार देण्यासाठी मदत करेल.दरम्यान, अमेरिकन काँग्रेसमध्ये संरक्षण बजेटशी संबंधित विधेयक रखडले आहे. ट्रम्प यांच्या लष्करी कारवाईबाबत काही खासदार नाराज आहे. पेंटागॉनचे बजेट 900 अब्ज डॉलरवरून 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याच्या व्हाइट हाऊसच्या प्रस्तावाला त्यांचा विरोध आहे.
