नवी दिल्लीः ब्राझीलमध्ये राजकीय संकट उभे राहिले असून, लोकशाही संकटात आली आहे. माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राजधानीमध्ये आंदोलन केले आहे. आंदोलन करणाऱ्यांनी संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टामध्ये घुसखोरी केलीय. नवीन राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डा सिल्वा यांना बोल्सोनारो समर्थकांनी विरोध दर्शविला आहे. येथील परिस्थितीवरून जगभरातील राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे.
आंदोलक हे रस्त्यावर आल्याने परिस्थिती दंगलीसारखी आहे. राजधानी ब्रासीलियामध्ये आंदोलक जोरदार प्रदर्शन करत आहेत. काही ठिकाणी हिंसा झाली आहे. ब्राझीलमध्ये ऑक्टोबर महिन्यात निवडणूक झाली होती. त्यात बोल्सोनारो यांचा पराभव झाला. तर लुइज इनासियो लूला डा सिल्वा यांनी तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मात्र शपथविधी झाल्यानंतर बोल्सोनारो यांचे समर्थक निवडणुकीचा निकाल मान्य करायला तयार नाहीत.
बोल्सोनारो समर्थक रविवारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचे कडे तोडून संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टात घुसखोरी करत तोडफोड केली. आंदोलनकर्त्यांनी संसदचे दरवाजे, खिडक्या तोडल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी चारशे आंदोलनकर्त्यांना अटक केली केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चिंता
ब्राझीलमधील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रासीलियामधील सरकारी संस्थांविरोधात दंगे आणि तोडफोडीचे वृत्त हे चिंताजनक आहे. लोकशाहीचा सर्वांनी सन्मान करायला हवा आहे, असे ट्वीट मोदी यांनी केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडून निषेध
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि विदेश मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी ब्राझीलमधील प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला आहे. लोकशाही संस्थांवरील हल्ला हा चुकीचा आहे. त्यासाठी हिंसा करणे ही चुकीचे असल्याचे अमेरिकेचे विदेश मंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे.