Download App

जमीन गेली, लाखो लोकांचा बळी, करारातही शरणागती.. युद्धात अन् तहातही ‘युक्रेन’ हरला

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Donald Trump) शरणागती पत्करली.

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियातलं तीन वर्षांचं युद्ध. दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं. शहरे उद्धवस्त झाली. लाखो लोकांचा बळी गेला. प्रतिबंध असतानाही रशिया सावरला. अमेरिकेच्या पाठबळानं युक्रेन युद्धात तीन वर्षे टिकला. पण, या तीन वर्षांत फायदा कुणाचा आणि नुकसान कुणाचं झालं असा प्रश्न विचारला तर धक्कादायक उत्तर मिळतं. रशिया, अमेरिका आणि युरोपिय देशांचा फायदा झाला आहेच. भविष्यातही होणार आहे. पण युक्रेनच असा  आहे की या युद्धात त्याला काहीच फायदा झाला नाही. जमीन गेली, शहरे उद्धवस्त झाली, लाखो लोकांचा बळी गेला सर्वात महत्वाचे म्हणजे वाटाघाटीच्या टेबलवरही युक्रेनचा पराभव झाला. यात नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम समजून घेऊ.. 

दहा मिनिटांच्या व्हिडिओनं राजकारणच बदललं

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Donald Trump) शरणागती पत्करली. या दोन्ही नेत्यांची भेट 28 फेब्रुवारी रोजी झाली होती. या भेटीचं दृश्य जगाने पाहिलं होतं खास करून दहा मिनिटांचा व्हिडिओ. यानंतर काही लोकांनी झेलेन्स्की यांचं प्रचंड कौतुक केलं. वा काय शानदार परफॉर्मन्स दिलाय. त्यांना असं वाटतं होतं की ही भेट म्हणजे एखाद्या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे आणि यात झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना एक प्रकारे पराभूत केले. पण आता या लोकांचा आनंद औटघटकेचा ठरला.

कारण त्यांना अंदाजच नव्हता की हे चित्र इतक्या लवकर पालटेल आणि पालटले सुद्धा. काही दिवसांपूर्वी झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या समोर सरळसरळ शरणागती पत्करली. त्यामुळे आता युक्रेनचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. पहिले म्हणजे झेलेन्स्की एक महिन्याच्या तात्पुरत्या युद्ध विरामासाठी तयार झाले आहेत.

अमेरिका दौरा आटोपून झेलेन्स्की थेट लंडनला पोहोचले होते. येथे 19 युरोपीय देशांची बैठक झाली. या बैठकीत ब्रिटन आणि फ्रान्सने युक्रेनच्या सुरक्षेसाठी सैन्य पाठवणार असल्याचे सांगितले. जर्मनी आणि इटलीने मात्र सैन्य पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. चर्चेनंतर झेलेन्स्की यांच्या लक्षात आले की डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेऊन काहीच मिळणार नाही. यापेक्षा ट्रम्प यांना शरण जाणे फायद्याचे ठरेल याची प्रचिती त्यांना आली.

यानंतर अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांत एक बैठक झाली. या बैठकीत एका करारावर सहमती झाली. पण यातून झेलेन्स्कीना काय मिळालं हा खरा प्रश्न आहे. रशियाने आमच्या ज्या भूभागावर कब्जा केला आहे तो परत द्या इतके म्हणण्याची देखील हिंमत झेलेन्स्की दाखवू शकले नाहीत. ही मागणीच त्यांनी केली नाही. रशियाने हल्ले थांबवावेत अशी मागणी त्यांनी या करारादरम्यान केली.

धक्कादायक! इस्त्रायलकडून गाझावर ‘एअर स्ट्राईक’, २३२ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जखमी

झेलेन्स्की वाद घालून गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जात असलेली लष्करी मदत आधी बंद केली. इंटेलिजन्स शेअरिंग देखील बंद केली. या गोष्टी होताच झेलेंस्कींचे विमान थेट जमिनीवर आले. आतापर्यंत रशियापासून कसातरी बचाव करता आला पण अमेरिकेशी पंगा घेणे बिलकुल परवडणार नाही. युरोपीय देश सुद्धा मदत करू शकणार नाहीत याची जाणीव त्यांना झाली.

ट्रम्प यांचा प्रस्ताव युक्रेनला मंजूर

ट्रम्प यांचे म्हणणे होते की युक्रेनच्या ज्या भागावर रशियाने कब्जा केला आहे तेथे दुर्मिळ खनिजे आहेत. ज्यावेळी यात अमेरिकेची एन्ट्री होईल तेव्हा दोन्ही देश यांत गुंतवणूक करतील. आमची गुंतवणूक म्हणजेच युक्रेनची सुरक्षा. यापेक्षा आणखी वेगळी सुरक्षेची हमी देण्यास ट्रम्प तयार नाहीत. युक्रेनला ट्रम्प यांचे म्हणणे गुपचूप मान्य करावेच लागले. आता हा प्रस्ताव रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना पाठवण्यात येणार आहे.

पुतिन हा प्रस्ताव मान्य करतील अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. तसे पाहिले तर या युद्धात रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. देशावर अनेक प्रतिबंध आहेत. अर्थव्यवस्था खालावली आहे. सैन्य स्थिती खराब झाली आहे. दोन्ही देशांचे लाखो लोक मारले गेले आहेत. युद्धविराम झाला तर युक्रेन आणि रशिया या (Ukraine War) दोन्ही देशांत पुनर्निर्माण सुरू होईल. यात युरोपियन देशांना मोठी संधी दिसून येत आहे.

युरोपीय देशांचं टेन्शन मिटलं, रशियाशी व्यापार सुरू होणार

पुनर्निर्माण कामाचा ठेका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मिळेल यात युरोपातील मोठ्या कंपन्या कामे मिळवण्यात यशस्वी ठरतील. म्हणजेच या देशांना युद्धातही फायदा होता आणि शांततेत देखील फायदाच आहे. पण रशिया आणि युक्रेनला काय मिळालं हा खरा प्रश्न आहे.

कोणत्याच देशाचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचं काय होतं? जाणून घ्या, नियम अन् कायदे..

रशियाला युक्रेनचा 20 टक्के भूभाग मिळाला. या भागात जी दुर्मिळ खनिज संपत्ती आहे ती देखील रशियाच्या ताब्यात गेली आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे आता युक्रेन नाटो संघटनेचा सदस्य होणार नाही. युक्रेनला काय मिळालं याचा विचार केला तर नाटोमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. अमेरिका सुरक्षेची लेखी हमी काही केल्या देणार नाही. ज्या भागावर रशियाने कब्जा केला आहे तो भूभागही परत मिळणार नाही.

रशिया अन् अमेरिका मालामाल

तसं पाहिलं तर यात रशिया आणि अमेरिका दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे. कोणत्या तरी मार्गाने युद्धातून बाहेर पडता येईल याचा प्रयत्न पुतिन यांच्याकडून केला जात होता. युद्धविराम ही त्यांच्यासाठी नामी संधी आहे. कारण युद्धविराम लागू झाला तर रशियावरील प्रतिबंध हटण्यास सुरुवात होईल. रशिया आपले कच्चे तेल जागतिक बाजारात विकू शकेल. युरोपातील देशांना कच्च्या तेलाबरोबरच गॅसची देखील मोठी गरज असते.

युरोपातील वातावरण पाहता येथील घरे आणि कार्यालये गरम ठेवण्यासाठी गॅसची आवश्यकता असते. इंडस्ट्रीयल वापरासाठी देखील गॅस आवश्यक असतो. या गोष्टी रशियाकडून युरोपीय देशांना सहज उपलब्ध होतील. युद्धविरामाचा हा फायदा युरोपिय देशांना होणार आहे.

युक्रेन युद्धात अन् तहातही हरला..

या सगळ्यात युक्रेनच असा आहे की ज्याचा काहीच फायदा होणार नाही. तीन वर्षे युद्ध सुरू ठेवलं. यासाठी हत्यारे खरेदी केली. याची किंमत आताच्या आणि नंतर येणाऱ्या पिढीला देखील चुकवावी लागणार आहे. भविष्यात जी मदत किंवा लष्करी सहायता घेतली जाईल त्याची सुद्धा किंमत चुकवावी लागणार आहे. युक्रेनने युद्धविराम करार मान्य केला म्हणून अमेरिकेने त्याला एक बक्षीस दिले आहे. बक्षीस काय तर जी सैन्य सहायता बंद केली होती ती पुन्हा सुरू करण्यात येईल. बंद केलेली इंटेलिजन्स शेअरिंग पुन्हा सुरू होईल. म्हणजेच एक खुळखुळा युक्रेनच्या हातात दिला आहे. कोणतीही नवीन घोषणा अमेरिकेने केलेली नाही. युद्धात युक्रेनचे जे नुकसान झाले आहे त्याच्या भरपाईचा कोणताच रस्ता नाही. युक्रेनचा जो हिस्सा रशियाने घेतला तो परत मिळणार नाही.

म्हणजेच तीन वर्षांच्या युद्धात झेलेन्स्की यांनी युक्रेनचा भूगोल छोटा केला आहे. अर्थव्यवस्था नष्ट केली. देशातील विकसित शहरे उद्ध्वस्त केली. लाखो नागरिकांचा बळी गेला इतके नुकसान सोसून शेवटी गुडघे टेकून तडजोड करावी लागली. झेलेनस्कींनी या गोष्टी केल्या. जर त्यांच्यात समज असती तर त्यांनी युद्धच केले नसते. तरीदेखील युद्ध झालंच असतं तर त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा किंवा तह करण्याचा मार्ग शोधला असता.

follow us