The number of job seekers in India increased by 30% : आखाती देशांमध्ये वाढत्या युद्धसंकटामुळे तेथे नोकरी करणाऱ्या भारतीयांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. अनेक वर्षांपासून करियर, आर्थिक स्थेर्य आणि सुरक्षित भविष्यासाठी जगातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण मानले जाणारे मध्यपूर्व आता अनिश्चिततेच्या छायेत सापडले आहे. वाढत्या तणावामुळे हजारो भारतीय नागरिकांच्या मनात सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत मध्यपूर्वेत तणाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. युनायटेड स्टेट्स आणि इस्राईल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने आखाती प्रदेशातील काही भागांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी संपूर्ण आखाती प्रदेशात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम तेथे काम करणाऱ्या परदेशी कामगारांवर, विशेषतः भारतीयांवर होताना दिसत आहे. अनेक दशकांपासून मध्यपूर्वेतील देश हे भारतीयांसाठी करियर घडवण्याचे आणि आर्थिक प्रगती साधण्याचे महत्वाचे केंद्र राहिले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक भारतीय पुन्हा मायदेशात परतण्याचा आणि भारतातच नोकरी शोधण्याचा विचार करू लागले आहेत.
देशातील काही आघाडीच्या कार्यकारी शोध कंपन्यांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत आखाती देशांमधून भारतात नोकरीसंदर्भात चौकशी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, भारतात नोकरी शोधणाऱ्या आखाती देशांतील व्यावसायिकांकडून होणाऱ्या चौकशीत सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ सध्याच्या भू-राजकीय अस्थिरतेचे स्पष्ट संकेत देणारी मनाली जात आहे.
रायगडमध्ये सत्तेचा नवा गेम; सुनील तटकरेंनी गोगावलेंना धडा शिकविला ?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या संघर्षामुळे मध्यपूर्वेत सुरक्षित आश्रयस्थान असल्याची धारणा मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. अनेक व्यावसायिक आता आर्थिक संधींपेक्षा स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता अधिक महत्वाची मानू लागले आहेत. त्यामुळे भारतात परत येऊन स्थिर आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा पर्याय अनेकांना अधिक योग्य वाटू लागला आहे.
कतारपासून दुबईपर्यंत भीतीचे सावट
या तणावामुळे परिणाम फक्त एका देशापुरते मर्यादित नाहीत. कतार पासून ते दुबई पर्यंत संपूर्ण आखाती प्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कतारमधील एका बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या माध्यम स्तरातील भारतीय व्यावसायिकांनी भारतात नोकरी शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, विशेषतः भारतात राहणाऱ्या वृद्ध पालकांमध्ये, तेथील परिस्थितीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दुबईमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय कुटुंबांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे वारंवार इशारे दिले जात आहेत. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, तसेच बाल्कनी आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचे अलर्ट देखील पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यपूर्वेतील ही वाढती अस्थिरता केवळ राजकीय किंवा लष्करी स्तरावरच मर्यादित नसून त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम देखील मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
