अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria)सोमवारी झालेल्या भूकंपातील (Earthquake)मृतांची संख्या आता सुमारे 8 हजारांवर पोहोचली आहे. अद्यापही बचावकार्य (Rescue work)सुरु आहे. मृताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)वर्तवली आहे. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपग्रस्त भागात तीन महिन्यांसाठी आणीबाणी (Emergency)जाहीर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओनं इतर देशांना सीरियाला जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहन केलंय.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी सकाळी 7.8, 7.6 आणि 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग मोठे भूकंप झाले. त्यामध्ये आत्तापर्यंत 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. डब्ल्यूएचओनं भूकंपामुळं दोन्ही देशातील 23 कोटी लोकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तुर्कीत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या भूकंपाची विदारकता समोर आली आहे. उत्तर सीरियात एका घराच्या ढिगाऱ्यातून नवजात अर्भकाला जिवंत बाहेर काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्याच्या आईचा त्यात मृत्यू झाला. अशा विदारक घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताहेत.
भारताकडून श्वान पथक, आर्मी फील्ड हॉस्पिटल आणि चार लष्करी विमानांमध्ये मदत सामग्रीसह शोध आणि बचाव पथक तुर्कीला पाठवण्यात आलंय. 30 खाटांची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी भारतानं तुर्की येथे भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल पाठवलंय.
आयएएफच्या पहिल्या विमानात 45 सदस्यीय वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले. त्यामध्ये क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि सर्जन यांचा सहभाग होता. त्यात एक्स-रे मशिन, व्हेंटिलेटर, ओटी आदी उपकरणेही पाठवण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांच्या माहितीनुसार, हवाई दलानं एकूण चार विमाने तुर्की येथे पाठवली आहेत. चौथे विमान उर्वरित फील्ड हॉस्पिटलसह तुर्कीकडं रवाना झालंय. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या वैद्यकीय पथकातील 54 सदस्यांचा तसेच सुविधा उभारण्यासाठी वैद्यकीय आणि इतर उपकरणांचा समावेश आहे.