Uproar at Chief Justice Suryakant’s program : युनायटेड किंग्डमच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडनमधील एका प्रतिष्टीत कार्यक्रमात गदारोळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आंतरराष्ट्रीय कायदा या महत्वपूर्ण विषयावर सुरू असलेल्या व्याख्यानादरम्यान एका व्यक्तीने विषयांतर करून राजकीय मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घटनेचा लंडनमधील भारतीय उच्चयोगाने तीव्र शब्दांत निषेध करत सार्वजनिक चर्चांमध्ये सभ्यता आणि परस्पर आदर राखण्याचे आवाहन केले आहे.
लंडनमधील बर्कबेक युनिव्हर्सिटीमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कायदेतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंटरनॅशनल लॉ या विषयावर सरन्यायाधीश सूर्यकांत आपले विचार मांडत होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा न्यायव्यवस्थेवर होणार प्रभाव, डिजिटल युगातील मानवी हक्कांचे संरक्षण, तंत्रज्ञानावरील नियमन आणि जागतिक स्तरावरील कायदेशीर चौकट यांसारख्या विषयांवर त्यांनी सखोल भाष्य केले.
भाषणानंतर सुरू झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, उपस्थित असलेल्या एका महिलेने कार्यक्रमाच्या मूळ विषयाशी संबंध नसलेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. भारतातील कथित असहिष्णुता, धार्मिक मतांतरे आणि सामाजिक वातावरण यासंदर्भातील मुद्दे उपस्थित करत तिने चर्चेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलं.
यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही प्रेक्षकांनी त्या प्रश्नाला विरोध दर्शवला, तर काहींनी प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचे समर्थन केले. परिणामी काही क्षण आरडाओरडा आणि शाब्दिक वाद निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी तातडीने हस्तक्षेप केला.
जीडीपी वाढीची दमदार झेप; चौथ्या तिमाहीत 7.8%, वार्षिक विकासदर 7.7 टक्क्यांवर
सूत्रसंचालकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा कार्यक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयासाठी आयोजित करण्यात आला असून विचारला गेलेला प्रश्न चर्चेच्या विषयाशी संबंधित नाही. त्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि कार्यक्रम पुन्हा मूळ विषयाकडे वळवला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण शांत झाले आणि पुढील प्रश्नोत्तरांचे सत्र सुरळीतपणे पार पडले.
या घटनेनंतर भारतीय उच्चायोगाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत संबंधित वर्तनावर नाराजी व्यक्त केली. उच्चायोगाने म्हटले की, लोकशाही व्यवस्थेत मतभिन्नता आणि विविध विचारांचे स्वागत केले जाते. मात्र, मतभेद व्यक्त करताना सभ्यतेची आणि संवादाच्या मर्यादांची जाणीव ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक आणि बौद्धिक मंचांवर संवादाची गुणवत्ता आणि परस्पर आदर यांना विशेष महत्त्व असते. अशा मंचावर प्रेक्षकांकडून करण्यात आलेले उद्धट आणि अशिष्ट वर्तन सार्वजनिक चर्चेच्या मूल्यांना धक्का देणारे असून पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी कार्यक्रमाच्या विषयाशी असंबंधित प्रश्न उपस्थित करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत कठोर प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यामुळे या घटनेवरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक शिष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरील संवादाच्या मर्यादा यांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या गदारोळाच्या घटनेपूर्वी आपल्या मुख्य भाषणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तंत्रज्ञान आणि घटनात्मक मूल्यांमधील संतुलन राखण्याची गरज अधोरेखित केली. तंत्रज्ञान हे स्वतःहून ना चांगले असते ना वाईट; त्याचा वापर समाज कोणत्या नैतिक आणि लोकशाही चौकटीत करतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
निदा खानचे कारनामे! ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे
ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान विस्तारामुळे न्याय, गोपनीयता, समानता आणि मानवी हक्कांसमोर नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देतानाच तिच्यावर आवश्यक नियंत्रण ठेवणारी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणारी कायदेशीर चौकट विकसित करणे अत्यावश्यक आहे.
कायद्याची भूमिका तंत्रज्ञानाला रोखण्याची नाही आणि त्यापुढे शरण जाण्याचीही नाही. उलट, तंत्रज्ञानाची शक्ती घटनात्मक मूल्ये, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही तत्त्वे आणि न्यायाच्या मूलभूत संकल्पनांप्रती उत्तरदायी राहील याची खात्री करणे हेच आधुनिक न्यायव्यवस्थेचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
लंडनमधील या घटनेमुळे सरन्यायाधीशांच्या व्याख्यानापेक्षा कार्यक्रमादरम्यान झालेल्या गदारोळाची अधिक चर्चा होत असली, तरी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक कायदेव्यवस्थेच्या भविष्यासंदर्भात त्यांनी मांडलेले विचारही तितकेच महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
