निदा खानचे कारनामे! ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे
पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा तपासातून झाला आहे.
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस महिला (Nashik) कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक आणि मोठे खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी निदा खान हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पीडितेचं धर्मांतर करण्यासाठी तिला इस्लाम अॅप डाऊनलोड करून देण्यात आलं होतं.
त्याचबरोबर ऑफिसच्या पॅट्रीमध्ये तिच्यासोबत अश्लील चाळेही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि छळाचा संपूर्ण घटनाक्रम या चार्जशीटच्या माध्यमातून समोर आला आहे. आता पोलिसांनी दाखल केलेल्या या अधिकृत दोषारोपपत्रात थेट कट्टरवादी झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा तपासातून झाला आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेले झाकीर नाईकचे व्हिडीओ वापरून पीडितेचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात होता.
टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड; मतीन पटेलांची तीनदा चौकशी, इम्तियाज जलीलांनाही SIT चे समन्स?
पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटनुसार, या प्रकरणात दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेचे शोषण केले. या आरोपींनी मिळून पीडितेच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिला छळले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मतीन पटेल याच्यावरही पोलिसांनी ठपका ठेवला असून, मुख्य आरोपी निदा खानची अटक टाळण्यासाठी तिला आश्रय दिल्याचा आरोप मतीनवर आहे.
आरोपींनी पीडित तरुणीला 2022 मध्ये टीसीएस कंपनीत नोकरी मिळवून दिली होती. त्यानंतर हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यं करून त्यांनी पीडितेच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावल्या. आरोपी दानिश शेख याने पीडितेला लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्याशी वारंवार इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या जातीवरून अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर करून मानसिक छळ केला.
पीडितेचे धर्मांतर करण्यासाठी तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने इस्लाम धर्माचे विशेष अॅप डाऊनलोड करून देण्यात आले. याशिवाय तिला सातत्याने इस्लाम धर्माशी संबंधित रील्स, व्हिडीओ आणि फोटो पाठवले जात होते.
पीडितेला इस्लाम धर्माची पुस्तके वाचण्याची सक्ती करण्यात आली. तिच्या इच्छेविरोधात तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले गेले, तसेच रोजा ठेवण्यासाठी तिच्यावर अतोनात दबाव आणण्यात आला. आरोपींनी पीडित हिंदू तरुणीचे नाव बदलून ‘हनिया’ असं मुस्लिम नाव ठेवलं होतं. तिने नमाजपठण केले नाही, तर तिचे कुटुंबीय नरकात जातील, अशी भीती दाखवून तिचे मानसिक खच्चीकरण केलं गेलं.
मुख्य आरोपी दानिशने केवळ पीडितेचे शारीरिक शोषण केले नाही, तर तिच्याकडून अत्यंत किमती वस्तू आणि मोठी रोख रक्कमही लुबाडली. तर दुसरा आरोपी तौफिक अत्तार याने थेट ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये पीडितेचा विनयभंग करत तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.