धर्मांतर खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश, तपासातील प्रत्येक पॅटर्न तपासण्याच्या सूचना

धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा देखील त्यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

  • Written By: Published:
Untitled Design 2

Strict orders from the Chief Minister : राज्यात गाजत असलेल्या विविध संवेदनशील प्रकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या उच्चस्तरियय बैठकीत सखोल आढावा घेतला. नाशिक धर्मांतर प्रकरण, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण, खरात प्रकरण आणि मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरण या सर्व प्रकरणांतील तपास अधिक प्रभावी, वेगवान आणि निष्पक्ष करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा देखील त्यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसआयटी प्रमुख आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नाशिक धर्मांतर प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी तपास अधिक खोलवर नेण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील सर्व पॅटर्नचा बारकाईने अभ्यास करून कोणताही धागा सुटू नये, याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण स्वतःहून उजेडात आणल्याबद्दल नाशिक पोलिसांचे त्यांनी कौतुक केले, मात्र पुढील तपास देखील तितकाच ठोस आणि परिणामकारक असावा, यावर त्यांनी भर दिला. परतवाडा लैंगिक शोषण प्रजननात पीडितांचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पीडितांना पुढे येऊन तक्रार देण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी समुपदेशनाची मदत घ्यावी, तसेच समाजसेवकांचा सहभाग वाढवून त्यांना मानसिक आधार द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते; महिला आरक्षणावरून काँग्रेसचा तांबे यांच्यावर निशाणा

खरात प्रकरणात देखील तपासाची दिशा स्पष्ट आणि ठोस ठेवण्याचे आदेश देत, दोषी कोणीही असो त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेत खटला मजबूत राहण्यासाठी पुरावे भक्कम असावेत आणि अपराधसिद्धी हा तपासाचा केंद्रबिंदू असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात दोन तरुणांच्या मृत्यूमुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ड्रग्जविरोधी कारवायांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तरुणाईच्या भविष्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने अशा प्रकारणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

याचवेळी नाशिक धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तिचे वकील बाबा सय्यद यांनी ही माहिती दिली. सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. निदा खान गर्भवती असून तिच्यावर उपचार आवश्यक आहेत, तसेच या प्रकरणाशी तिचा कोणताही संबंध नसल्याचा दावा तिच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, एसआयटीने मुंब्रा येथे जाऊन तिच्या पतीची चौकशी केली होती. तसेच संबंधित कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने अधिकृत पत्राद्वारे निदा खान ही एचआर हेड नसून प्रोसेस असोसिएट असल्याचे स्पष्ट केले आहे.

एकूणच, राज्यातील संवेदनशील आणि चर्चेतील प्रकरणांवर सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणांच्या तपासात वेग आणि परिणामकारकता दिसून येण्याची शक्यता आहे.

follow us