आमच्या जहाजाला आग लागलीय, आम्हाला वाचवा! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर भारतीय खलाशांचा SOS संदेश; अखेर सर्व 24 जण सुरक्षित

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जहाजाला भीषण आग लागली आणि काही काळासाठी जहाज बुडण्याच्या स्थितीत पोहोचल्याच सांगितलं जात आहे.

Untitled Design 67

Untitled Design 67

US attack on an Indian ship : ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मॅरिव्हेक्स नावाच्या तेलवाहू टँकरवर अमेरिकेकडून मिसाईल हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर जहाजाला भीषण आग लागली आणि काही काळासाठी जहाज बुडण्याच्या स्थितीत पोहोचल्याच सांगितलं जात आहे. या टँकरवर त्यावेळी एकूण 24 खलाशी कार्यरत होते आणि विशेष म्हणजे सर्व कर्मचारी भारतीय नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी आर्त हाक देत तातडीचे संदेश पाठवले.

बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार जहाजावरील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पाठवलेल्या संदेशात परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले होते. सर, आम्ही मोटर टँकर मॅरिव्हेक्सवरून बोलत आहोत. आमच्या जहाजाला आग लागली आहे आणि जहाज बुडत आहे. अमेरिकन नौदलाने आमच्या जहाजावर हल्ला केला असून इंजिन रूमवर मिसाईल आदळली आहे. जहाजाच्या तळाला छिद्र पडले आहे. आम्ही 24 जण आहोत आणि सर्व कर्मचारी भारतीय आहोत. कृपया आम्हाला तात्काळ मदत करा, असा संदेश त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

इतिहास पुसून टाकता येत नाही, नेहरूंचे योगदान अतुलनीय, मोदी-नेहरू तुलना वादावर शरद पवारांचे स्पष्ट मत

हा संदेश मिळाल्यानंतर संबंधित भरतोय यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. माहिती मुंबईतील एमआरसीसी अर्थात मेरीटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरपर्यंत पोहोचल्यानंतर परिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर ओमानच्या समुद्र शोध आणि बचाव केंद्राशी त्वरित संपर्क साधण्यात आला. ओमानच्या लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवत जहाजावरील सर्व 24 भारतीय खलाशांची सुखरूप सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. बचाव मोहिमेनंतर सर्व खलाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांड अर्थात ‘सेंटकॉम’ने या कारवाईची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. सेंटकॉमच्या दाव्यानुसार, संबंधित जहाज अमेरिकेने घातलेल्या नाकेबंदीचे उल्लंघन करत इराणच्या बंदराच्या दिशेने जात होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. सेंटकॉमने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण केलेल्या ‘F/A-18 सुपर हॉर्नेट’ लढाऊ विमानाने जहाजाच्या इंजिनिअरिंग आणि स्टिअरिंग विभागावर अचूक लक्ष्यभेदी शस्त्रास्त्रांचा वापर करून हल्ला केला.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, भारतीय खलाशांच्या जीवावर बेतलेली ही घटना जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Exit mobile version