US attack on Iran : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षाने पन्हे एकदा धोकादायक वळण घेतले आहे. युध्दविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेने इराणमध्ये रात्री उशिरा मोठी लष्करी कारवाई केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणमधील अशा एका लष्करी ठिकाणावर हल्ला केला, जिथून अमेरिकन सैन्य तसेच जगातील व्यापारी जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला होता.
विशेष म्हणजे ही कारवाई जगातील सर्वात महत्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मूझ अर्थात होर्मूझ सामुद्रधुनी परिसरात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. या भागातून जगातील मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक होत असल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने केवळ हवाई हल्लेच केले नाहीत, तर अमेरिकन दलावर आणि व्यापारी जहाजांवर संभाव्य हल्ल्याचा धोका निर्माण करणारे जेणेक इराणी ड्रोन देखील हवेतच उध्वस्त केले. या कारवाईची माहिती याआधी गुप्त ठेवण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे मध्यपूर्वेत भीषण अस्थिरता निर्माण झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणशी संबंधित लक्ष्यांवर संयुक्त हल्ले केल्यानंतर या संघर्षाची सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सातत्याने प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरू राहिल्या. या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
FDA चे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारताच तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; भेसळखोरांमध्ये खळबळ
युद्ध संपवण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असतानाच अमेरिकेच्या नव्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, इराणी सरकारी माध्यमांनी इराण आणि ओमान मिळून होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीचे संयुक्त व्यवस्थापन करणार असल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा फेटाळून लावत “होर्मुझ सामुद्रधुनी खुलीच राहील,” असे स्पष्ट केले.
याआधी सोमवारी देखील अमेरिकेने इराणविरोधात ‘संरक्षणात्मक कारवाई’ केल्याचे सांगितले होते. मात्र इराणने हा हल्ला युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून समुद्रात स्फोटके टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोटी तसेच क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांवर लक्ष्य साधण्यात आले होते.
सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली असून, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात लष्करी हालचालींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगातील ऊर्जा पुरवठ्याचा मोठा भाग या समुद्री मार्गावर अवलंबून असल्यामुळे या संघर्षाचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील हा संघर्ष आता नेमका कोणत्या दिशेने जाणार, युद्धविराम टिकणार की पुन्हा मोठ्या युद्धाची ठिणगी पडणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
