Download App

धक्कादायक! अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार; तिघा जणांचा मृत्यू

विस्कॉन्सिन प्रांतातील एका शाळेत एका युवकाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला.

USA News : अमेरिकेतील गन कल्चर आता अधिक गंभीर झाले असून याचे दुष्परिणाम सातत्याने समोर येत आहेत. गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या गोळीबारात निरपराध नागरिकांचा जीव जात आहे. आताही अशीच धक्कादायक घटना पुन्हा घडली आहे. विस्कॉन्सिन प्रांतातील एका शाळेत एका युवकाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मॅडिसन पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका शाळेत जवळपास सहा लोक जखमी झाले आहेत. शाळेत ३९० विद्यार्थी शिक्षण घेतात. पोलिसांनी आधी सांगितले होते की या हल्ल्यात पाच लोकांचा मृ्त्यू झाला आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

मॅडिसन पोलीस प्रमुख शॉन बार्न्स यांनी माध्यमांना सांगितले की आजचा दिवस संपूर्ण देशासाठी दुःखद आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराने आत्महत्या केली. हल्लेखोर कोण होता याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. हल्लेखोराने गोळीबार का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. गोळीबार एकाच ठिकाणी झाला. परंतु, हे ठिकाण नेमकं कोणतं होतं याचा शोध पोलिसांना अजून घेता आलेला नाही.

या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घटनेची निंदा केली. या घटनेनंतर अमेरिकेत आता आणखी कठोर बंदूक कायद्यांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले आहे, असे बायडन म्हणाले.

follow us