Donald Trump On Venezuela Oil : इराण आणि अमेरिकेत सुरु असणाऱ्या संघर्षामुळे जगात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने अमेरिकेसह अनेक देशात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे आता अमेरिकेने मोठा निर्णय घेत व्हेनेझुएलासोबत कराराची घोषणा केली. या कराराची अंमलबजावणीनंतर अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाच्या प्रचंड साठ्यांपर्यंत उत्पादन खर्चाच्या दरात प्रवेश मिळणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कराराबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि व्हेनेझुएलाच्या (Venezuela) हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज (Delcy Rodriguez) यांच्यात चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी या कराराला जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार असं म्हटलं आहे.
या कराराच्या अटी काय ?
व्हेनेझुएलातील डेल्सी रॉड्रिग्ज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या करारामध्ये 65 अब्ज बॅरल तेलाची प्रमाणित क्षमता असलेल्या 17 तेल क्षेत्रांच्या विकासाचा समावेश आहे. या करारामुळे व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगात सुमारे 100 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे व्हेनेझुएला सरकारला 209 अब्ज डॉलर्सहून अधिक कर महसूल मिळणार आहे. व्हेनेझुएलाच्या आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये हा करार महत्त्वाची भूमिका बजावेल असं रॉड्रिग्ज प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अमेरिका व्हेनेझुएलातील एका खाजगी ऑपरेटरच्या भागीदारीत एक नवीन कंपनी स्थापन करेल. रॉड्रिग्ज प्रशासनाने या नवीन कंपनीला तेल क्षेत्रांच्या विकासासाठी 100 वर्षांचे अधिकार दिले आहेत. या नवीन कंपनीच्या प्रत्यक्ष उत्पादनापैकी 55 टक्के हिस्सा अमेरिकेला मिळेल. यामध्ये मालकी हक्क आणि उत्पादन खर्चाच्या दरात तेल खरेदी करण्याचा अधिकार यांचा समावेश असणार असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे. ही नवीन कंपनी प्रमाणित तेल साठ्यांची मालकी असलेली दुसरी सर्वात मोठी कॉर्पोरेट संस्था बनेल. या बाबतीत ती केवळ ‘सौदी अरामको’च्या मागे असेल. या क्षेत्रांतून मिळणारे तेल प्रामुख्याने अमेरिकेचा ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ (धोरणात्मक तेल साठा) भरून काढण्यासाठी आणि लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाईल असं देखील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र द्या, आजपासून मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण –
देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर नियंत्रित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर प्रचंड दबाव आहे. इराणशी सुरू असलेल्या संघर्षाला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले, तरीही हा संघर्ष कधी संपेल याची सध्या कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
