Download App

Video : कझाकिस्तानमध्ये मोठा अपघात; 67 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले, अनेकांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

Kazakhstan Plane Crash :  कझाकिस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ 67 प्रवाशांसह क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे विमान कोसळून मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आलेआहे. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. विमानात 62 प्रवासी आणि 5 क्रू सदस्यांसह 67 लोक होते. यात लहान मुलांचा समावेश नसून, लवकरच जखमींची माहिती दिली जाईल असे अझरबैजान एअरलाइन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत या अपघातातून 28 प्रवाशांना वाचवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अझरबैजान एअरलाइन्स फ्लाइट नंबर 8243 हे विमान अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील चेचन्याची राजधानी ग्रोझनी येथे जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. कझाकिस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ लँडिंग करताना झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून, अपघातानंतर विमानाने पेट घेतल्याचे दिसून येत आहे. हा अपघातात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेले नसून, अपघाताची भीषणता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रशियन वृत्तसंस्थांनी सांगितले की, हे विमान अझरबैजान एअरलाइन्सचे विमान रशियातील चेचन्या येथील बाकू येथून ग्रोझनीला जात होते, परंतु ग्रोझनीमध्ये धुक्यामुळे ते वळवण्यात आले. अपघातग्रस्त विमानाच्या समोर आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये अपघातापूर्वी विमान अनेकदा खाली वर होताना दिसून येत आहे. त्यानंतर शेवटच्या क्षणी हे विमान अगदी वेगाने खाली कोसळले आणि अपघात झाला. अपघातग्रस्त विमानात 37 प्रवासी अझरबैजानमधील, रशियाचे 16, 6 कझाकिस्तानचे तर, 3 प्रवासी हे किर्गिस्तानचे होते.

follow us