President Donald Trump Speech : गुरुवारची ती सकाळ… संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला होता. व्हाईट हाऊसच्या पोर्चमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प उभे राहिले, तेव्हा वाटलं होतं की, आज इराणचा नकाशा बदलणारी ‘आर-पार’ची घोषणा होईल. पण, ट्रम्प यांच्या 18 मिनिटे 31 सेकेंदांच्या भाषणाने जगाला चकित नाही, तर कोड्यात पाडलं. ट्रम्प यांच्या भाषणाचं लेट्सअपनं केलेलं विश्लेषण समजून घेऊया सोप्या शब्दात …
युद्धविराम न झाल्यास असं दुष्टचक्र सुरू होईल की…; IMF ने रिपोर्टमध्ये जगाला दिला सर्वात मोठा ‘अलर्ट’
व्हाईट हाऊसच्या पोर्चमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प देशाला संबोधित करण्यासाठी उभे राहिले त्यावेळी ट्रम्प यांच्या आवाजात युद्धाची गर्जना नव्हती, तर एक सुप्त ‘थकवा’ होता. शब्दांमागे लष्करी रणनीती नव्हती, तर केवळ ‘घरगुती राजकारणाचे’ आडाखे होते. ट्रम्प यांच्या आजच्या भाषणाला त्यांचे पाठीराखे ‘व्हिक्टरी स्पीच’ म्हणत असले, तरी राजकीय तज्ज्ञांच्या नजरेत हा विजय नसून, आखातातील चिखलातून बाहेर पडण्यासाठी शोधलेला एक ‘सन्मानजनक माघारीचा’ रस्ता आहे. President Donald Trump Speech
आता भाषणात ट्रम्प यांनी जे दावे केले, ते नवे मुळीच नव्हते. “इराणी नेतृत्वाचा सफाया झालाय”, “परमाणु तळ उद्ध्वस्त झालेत”, “वीज प्रकल्प उडवून देऊ”… हे सगळं ट्रम्प गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर ओरडून सांगत आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा राष्ट्रप्रमुख आपल्या लष्करी धमक्यांचा सोशल मीडियावर असा ‘बाजार’ करतो, तेव्हा त्या धमक्यांची धार संपते. आज ट्रम्प यांचे हे दावे एखाद्या जुन्या घासून पुसून गुळगुळीत झालेल्या रेकॉर्डसारखे वाटतायत. जगाला कळून चुकलंय की, ट्रम्प यांच्याकडे आता सांगण्यासारखं काहीच नवीन उरलेलं नाही.
भाषणात ट्रम्प यांनी व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानची तुलना केली. हा सर्वात मोठा ‘हिंट’ होता. 32 दिवसांच्या मोहिमेला ते ‘इतिहासातील सर्वात मोठा विजय’ का म्हणतायत? तर, ट्रम्प यांना आता अमेरिकन मतदारांना सांगायचंय की, I am coming home! कारण तेलाचे वाढते भाव आणि कोसळणारा शेअर बाजार ट्रम्प यांची झोप उडवत आहे. ट्रम्प यांना ‘अमेरिका फर्स्ट’ ही आपली प्रतिमा जपायची आहे. म्हणूनच, इराणचा आता ‘धोका उरलेला नाही’ असं भासवून ते आपली सेना परत बोलावण्यासाठी एक सुरक्षित बहाणा शोधत आहेत. इराण ‘संपलाय’ असं वारंवार सांगणं, हा एखाद्या विजेत्याचा आत्मविश्वास नाही, तर माघार घेणाऱ्या नेत्याची लाचारी आहे.
ट्रम्प यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मागितलेली 2 ते 3 आठवड्यांची मुदत. ट्रम्प म्हणाले की, या काळात अमेरिका सर्वात भीषण हल्ला करेल. पण लष्करी तज्ज्ञांच्या मते हा कोणताही प्लॅन नसून एक ‘एग्जिट स्ट्रॅटेजी’ आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसांत ट्रम्प एका ‘आर्टिफिशियल व्हिक्टरी’ची घोषणा करतील आणि स्वतःची ‘स्ट्राँग इमेज’ वाचवून या युद्धातून बाहेर पडतील.
18 मिनिटांच्या भाषणात होर्मुझच्या खाडीची सुरक्षा आता इतर देशांनी स्वतः करावी, हे ट्रम्प यांचं विधान सर्वात बोलकं आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकेला आता मध्य-पूर्वेतील सुरक्षेचं ओझं वाहायचं नाहीये. येत्या 15 दिवसांत एक मोठा हवाई हल्ला होईल, जेणेकरून ट्रम्प जगाला म्हणू शकतील की, मी करून दाखवलं. इराणच्या नेतृत्वाला ‘लॉजिकल’ म्हणत त्यांनी आधीच तहाचे दरवाजे उघडलेत. त्यांना युद्धाचा शेवट एका कराराने करायचा आहे, जेणेकरून ते स्वतःला ‘ग्रेट डीलमेकर’ सिद्ध करू शकतील. पण, थोडक्यात सांगायचं तर, ट्रम्प यांचं आजचं भाषण हे हल्ल्याची पूर्वसूचना नव्हती तर, आखातात गेल्या 32 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या समाप्तीची नांदी होती.
WATCH IN FULL: President Donald J. Trump delivers a primetime address to the nation on Operation Epic Fury. pic.twitter.com/ADbwwdrwVc
— Rapid Response 47 (@RapidResponse47) April 2, 2026
