Why Inflation Is Hard To Control Recession : अर्थव्यवस्थेत महागाई का वाढते? मंदी आली की कंपन्या नोकरभरती का थांबवतात? आणि व्याजदर बदलूनही महागाईवर नियंत्रण मिळवणं कधी कधी कठीण का ठरतं? या प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या संशोधनासाठी अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना 2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्थव्यवस्थेतील चढ-उतार कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यापक आर्थिक स्थिरीकरणाच्या धोरणांना सूक्ष्म अर्थशास्त्राचा भक्कम पाया देणाऱ्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. भारतात सप्टेंबरमध्ये महागाईचा दर 5.54 टक्क्यांवर पोहोचला असून ऑगस्टमध्ये हाच दर 4.83 टक्के होता. या पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणात आणणं इतकं कठीण का असतं आणि मंदीच्या काळात रोजगारावर परिणाम का होतो, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्याबद्दल जाणून घेऊया…
अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांच्य संशोधनाचा संबंध केवळ सरकारच्या आर्थिक धोरणांशी नाही, तर सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशीही आहे. महागाई वाढली की किराणा, भाजीपाला, इंधन आणि घरखर्चाचं बजेट कोलमडतं. दुसरीकडे, अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला की कंपन्यांची विक्री कमी होते, नवीन भरती थांबते आणि रोजगाराच्या संधी घटतात. या सगळ्यामागे ग्राहकांचे निर्णय, कंपन्यांच्या अपेक्षा आणि सरकारच्या आर्थिक धोरणांचा एकमेकांशी असलेला संबंध महत्त्वाचा असतो. महागाई नियंत्रणात आणणं हे केवळ सरकारसमोरचं नव्हे, तर मध्यवर्ती बँकेसमोरचंही मोठं आव्हान असतं. यामागे वस्तूंच्या किमती वाढण्याबरोबरच कंपन्यांचे निर्णय, बाजारातील मागणी आणि भविष्यातील आर्थिक परिस्थितीविषयीच्या अपेक्षाही महत्त्वाच्या ठरतात.
महागाईला लगाम घालणं कठीण का?
समजा, एखाद्या कंपनीला पुढील काही महिन्यांत कच्चा माल, वीज किंवा इंधन महाग होण्याची शक्यता वाटते. अशा वेळी प्रत्यक्ष खर्च वाढण्याआधीच कंपनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. म्हणजेच महागाईवर केवळ आजच्या परिस्थितीचा परिणाम होत नाही, तर भविष्यात काय घडेल, या अंदाजाचाही परिणाम होतो.
दुसरीकडे, बाजारातील मागणी कमी झाली तरी कंपन्या लगेच किमती कमी करतीलच असं नाही. कारण किमती वारंवार बदलण्यात वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला किंवा मागणी घटली, तरी ग्राहकांना त्याचा फायदा लगेच मिळेलच असं नाही. अर्थतज्ज्ञ मायकेल वुडफोर्ड यांच्या संशोधनातून कंपन्यांच्या निर्णयांचा आणि भविष्यातील अपेक्षांचा महागाईवर कसा परिणाम होतो, हे समजण्यास मदत होते. अशा आर्थिक मॉडेल्सच्या मदतीने मध्यवर्ती बँका व्याजदरांमध्ये बदल केल्यास महागाईवर काय परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज घेतात.
मंदी आली की, नोकऱ्या का कमी होतात?
महागाईमुळे खर्च वाढतो, तर मंदीच्या काळात उत्पन्न आणि रोजगाराबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते. अशा वेळी लोक भविष्यातील गरजांसाठी पैसे वाचवण्याला प्राधान्य देतात आणि अनावश्यक खरेदी टाळतात. परिणामी बाजारातील मागणी कमी होते. मागणी घटल्याने कंपन्यांची विक्री कमी होते. विक्री कमी झाली की उत्पादन घटवण्याची वेळ येऊ शकते. कंपन्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन भरती थांबवतात. परिस्थिती आणखी बिघडल्यास कर्मचाऱ्यांची कपातही केली जाऊ शकते. अशा प्रकारे मंदीचा परिणाम थेट रोजगारावर होतो.
अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल यांच्या संशोधनातून कुटुंबं सध्याच्या उत्पन्नासोबत भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून खर्चाचे निर्णय कसे घेतात, हे समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, नोकरी जाण्याची भीती वाटत असेल, तर एखादी व्यक्ती आजपासूनच खर्च कमी करू शकते. अनेक कुटुंबांनी एकाच वेळी खर्च कमी केला, तर बाजारातील मागणी आणखी घटू शकते. यामुळे कंपन्यांचा व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी या दोन्हींवर परिणाम होतो.
मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर कसं काढता येतं?
मागणी कमी झाल्याने अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, तर सरकार सार्वजनिक खर्च वाढवून आर्थिक व्यवहारांना चालना देऊ शकते. रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक प्रकल्पांवरील खर्चामुळे रोजगारनिर्मिती होऊ शकते. लोकांच्या हातात पैसा आला, तर वस्तू आणि सेवांची मागणी वाढण्यासही मदत मिळू शकते.
अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी आर्थिक मंदीच्या काळात सरकारने खर्च वाढवून मागणीला आधार देण्याची भूमिका मांडली होती. मात्र, कोणता उपाय किती प्रभावी ठरेल, हे त्या वेळची महागाई, बेरोजगारी, सरकारी आर्थिक स्थिती आणि बाजारातील परिस्थिती यांवर अवलंबून असतं.
महागाई वाढण्यामागची पाच कारणं?
1. मागणी वाढणे : एखाद्या वस्तूची मागणी वाढली, पण त्या प्रमाणात पुरवठा वाढला नाही, तर तिची किंमत वाढू शकते.
2. उत्पादन खर्च वाढणे : कच्चा माल, वीज, इंधन, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यास कंपन्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात.
3. पुरवठ्यात अडथळे येणे : दुष्काळ, पूर, युद्ध किंवा वाहतूक व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे वस्तूंची उपलब्धता कमी होते. त्याचा परिणाम विशेषतः अन्नधान्य आणि इंधनाच्या किमतींवर होऊ शकतो.
4. कंपन्यांच्या भविष्यातील अपेक्षा : भविष्यात खर्च वाढण्याची शक्यता वाटल्यास कंपन्या आधीच किमती वाढवू शकतात. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची होते.
5. आयात महाग होणे : डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर भारतासाठी आयात महाग होऊ शकते. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किमतींवर होण्याची शक्यता असते.
आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत एका देशातील घडामोडींचा परिणाम दुसऱ्या देशावरही होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर तेल आयात करणाऱ्या देशांचा खर्च वाढतो. भारतासारख्या देशात याचा परिणाम इंधन, वाहतूक आणि उत्पादन खर्चावर होऊ शकतो. त्याचप्रमाणे, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी झाल्यास परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडी, चलनाचे मूल्य आणि देशांतर्गत मागणी यांचा एकत्रित परिणाम महागाईवर होतो.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचं महत्त्व काय?
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची स्थापना स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने 1968 मध्ये केली. हा पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या मूळ इच्छापत्रातील पुरस्कारांपेक्षा वेगळा आहे. अर्थव्यवस्था, आर्थिक निर्णय आणि मानवी वर्तन समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संशोधनाला या पुरस्काराने गौरवलं जातं. महागाई आणि मंदी यांसारख्या समस्या केवळ आकडेवारीपुरत्या मर्यादित नसतात. तर, त्या सामान्य माणसाच्या बचतीवर, घरखर्चावर, नोकरीवर आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम करतात. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणताना केवळ व्याजदर बदलून चालत नाही तर, पुरवठा, उत्पादन खर्च, ग्राहकांची मागणी आणि कंपन्यांचे निर्णय यांचाही विचार करावा लागतो.
एकूण काय तर, अर्थव्यवस्थेचं खरं यश केवळ महागाईचा दर कमी करण्यात किंवा विकासाचा वेग वाढवण्यात नाही, तर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणाऱ्या किमती, हाताला स्थिर रोजगार आणि भविष्याबद्दलचा विश्वास निर्माण करण्यात आहे. नोबेलविजेत्या अर्थतज्ज्ञांचं संशोधन हेच अधोरेखित करतं की, अर्थव्यवस्थेतील चढ-उतार समजून घेण्यासाठी केवळ आकडे पाहून चालत नाही; तर त्या आकड्यांमागे असलेले ग्राहकांचे निर्णय, कंपन्यांच्या अपेक्षा आणि सरकारी धोरणांचे परिणामही समजून घ्यावे लागतात. कारण शेवटी महागाईचा खरा परिणाम आकडेवारीत नाही, तर महिन्याचं बजेट सांभाळणाऱ्या कुटुंबात आणि नोकरी टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात दिसतो.
