डोनाल्ड ट्रम्पवर कुणी केला गोळीबार? पोलिसांनी ‘तो’ हल्लेखोर शोधून काढलाच

पेनसिल्वेनिया रॅलीत गोळीबार करणाऱ्या युवकाचं नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असं असून तो फक्त 20 वर्षांचा आहे.

Donald Trump

Donald Trump

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची धामधूम (US Election) सुरू आहे. यातच गोळीबारीच्या घटनेने अमेरिका पुन्हा हादरली. हा गोळीबार साधासुधा नव्हता. थेट माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) टार्गेट केलं होतं. गोळी त्यांच्या कानाला घासून गेली. यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर आता या घटनेत महत्वाची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे. पेनसिल्वेनिया रॅलीत गोळीबार करणाऱ्या युवकाचं नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असं असून तो फक्त 20 वर्षांचा आहे. या हल्लेखोराने फक्त 130 मीटर दूर अंतरावरील एका उंच ठिकाणावरून लागोपाठ गोळ्या झाडल्या.

मोठी बातमी! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कानाला चाटून गेली

सीएनएनच्या रिपोर्टरनुसार, एफबीआयने या घटनेचा तत्काळ तपास सुरू केला होता. यानंतर त्यांनी हल्लेखोराला शोधून काढले. हा हल्लेखोर पेनसिल्वेनियातीलच रहिवासी आहे. सिक्रेट सर्व्हिसच्या एका निवेदनानुसार या हल्लेखोराला जागेवरच ठार करण्यात आले. या गोळीबाराच्या घटनेत हल्लेखोरा व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोहिम थांबवण्यात येईल असे वाटत होतं. परंतु, असे काही होणार नाही. त्यांचे कॅम्पेन सुरुच राहणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आहेत. या दोन्ही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ट्रम्प सातत्याने रॅली काढत आहेत. यातीलच एका रॅली दरम्यान शनिवारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

भारतीय वंशाच्या डॉक्टरला रिपब्लिकन पक्षात मोठा मान, डोनाल्ड ट्रम्पसाठी बजावणार महत्वाची भूमिका 

या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काहीतरी घरघर वाजल्याचा आवाज मी ऐकला. लगेच जाणवलं की आपल्या त्वचेला काहीतरी कापत आहे. खूप रक्तस्त्राव होत होता. त्यावेळी मला जाणीव झाली की माझ्या कानाला गोळी लागली आहे.

पीएम मोदींनी कठोर शब्दांत केला निषेध

या घटनेचे पडसाद जगभरात उमटले आहेत. जगातील प्रमुख नेत्यांनी या घटनेची निंदा केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे. माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याने मी खूप व्यथित झालो आहे. या हल्ल्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला कुठेच स्थान नाही. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही (Rahul Gandhi) या हल्ल्याचा निषेध केला. अशा हिंसक कृत्यांची कठोर शब्दांत निंदा करायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले.

Exit mobile version