World’s Cheapest and Expensive Cities : जगातील सर्वात स्वस्त आणि महागड्या शहरांची यादी समोर आली आहे. या यादीत भारताने बाजी मारली आहे. भारतातील नऊ शहरे सर्वात स्वस्त (Cheapest City in India) असल्याचे यादीत नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानची (Pakistan) फक्त तीन शहरे स्वस्त असल्याचे म्हटले आहे. डाटा कंपनी नूबियोकडून ‘नुबियो कोस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2025’ नावाने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जगातील 327 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
जगातील 14 सर्वात स्वस्त शहरांमध्ये इजिप्त, भारत आणि पाकिस्तानातील शहरे (India Pakistan) आहेत. कंपनीने न्यूयॉर्क शहरातील खर्चाच्या आधारावर जगातील शहरांची तुलना करून हा सर्वे केला आहे. या सर्वेनुसार सर्वात महागड्या शहरांत स्वित्झर्लंडमधील पाच शहरांचा समावेश आहे. तर अमेरिकेतील चार शहरे सर्वात महागडी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या दोन देशांव्यतिरिक्त वीस महागड्या शहरांत सिंगापूर, ब्रिटन, आइसलँडमधील शहरे आहेत.
जगातील सर्वात स्वस्त 14 शहरांत इजिप्तमधील दोन, भारतातील नऊ आणि पाकिस्तानातील तीन शहरे आहेत. भारतातील कोइंबतूर शहर सर्वात स्वस्त शहर आहे. यादीत हे शहर 327 व्या क्रमांकावर आहे. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया 326, पाकिस्तानातील लाहोर 325 आणि 324 व्या क्रमांकावरील कराची जगातील सर्वात स्वस्त शहर आहे असे या यादीत नमूद करण्यात आले आहे.
पनामा अन् कोस्टा रिका! भारतीयांना दुसऱ्या देशांत का धाडतोय अमेरिका? ट्रम्पचा प्लॅन नक्की काय?
भारतातील अन्य स्वस्त शहरांत उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (323), जयपूर 322, सुरत 321 , कोच्ची 320, भुवनेश्वर 319, कोलकाता 318, वडोदरा 316 आणि चंदिगढ 315 व्या क्रमांकावर आहे. या यादीत मुंबई 286, गुरुग्राम 291, पुणे 299, दिल्ली 301, नोएडा 303, हैदराबाद 309, अहमदाबाद 310 आणि चेन्नई 311 व्या क्रमांकावर आहे.
जगातील सर्वात महागड्या शहरांत स्वित्झर्लंडमधील पाच शहरांचा समावेश आहे. ज्युरीख सर्वात महागडे शहर आहे. यानंतर लॉजेन आणि जिनिव्हा या शहरांचा नंबर आहे. चौथ्या क्रमांकावर न्यूयॉर्क पाचव्या स्थानावर पुन्हा स्वित्झर्लंडमधील बाजले तर सहाव्या क्रमांकावर बर्न शहर आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सातव्या आणि होनोलुलू आठव्या क्रमांकावर आहे. आइसलँडमधील रेकजाविक आणि अमेरिकेतील बोस्टन शहरे टॉप 10 महागड्या शहरांच्या यादीत आहेत. यानंतर सिंगापूर 11, वॉशिंग्टन 13 आणि लंडन 14 व्या क्रमांकावर आहे.
रशिया युद्ध थांबवणार! अमेरिका अन् रशियाचा पुढाकार; ‘रियाद’मध्ये नेमकं काय घडलं?
दरम्यान न्यूयॉर्कमध्ये (New York) लाईफस्टाईलवर होणाऱ्या खर्चाशी अन्य देशांत राहणाऱ्या लोकांच्या खर्चाची तुलना करून रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये घराचे भाडे, भोजन, अन्य आवश्यक खर्च, ट्रान्सपोर्ट, खाणेपिणे यांसारख्या दररोजच्या गोष्टींवर होणाऱ्या खर्चाची तुलना करण्यात आली आहे. एकूणच विकसित आणि कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांतील शहरे महागडी ठरली आहेत. तर जास्त लोकसंख्या आणि विकसित होणाऱ्या देशांत अनेक समस्या असतानाही ही शहरे स्वस्त ठरली आहेत.