3 children die of severe burns : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. नवजात शिशु अतिदक्षता विभागातील (एसएनसीयू) एका कक्षात लागलेल्या आगीमुळे धुराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आणि त्यात तीन चिमुकल्या बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. तर सहा अर्भकांवर सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर आग वेगाने पसरली आणि संपूर्ण कक्ष धुराने भरून गेला. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत बालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र धुरामुळे तीन बालकांचा मृत्यू झाला.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे तीन स्वतंत्र कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाची क्षमता 13 बालकांची असून एकूण 39 नवजात अर्भकांवर येथे उपचार करता येतात. आग लागलेल्या कक्षात त्या वेळी 12 बालके उपचार घेत होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य राबवले असले तरी काही बालकांना धुराचा फटका बसला. काही अर्भकांच्या हातापायांना किरकोळ भाजल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
… नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा कुणाला ?
विशेष बाब म्हणजे हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वीच सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या विभागात अशी दुर्घटना कशी घडली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन आणि अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही, याबाबतही चौकशीची मागणी होत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेची जबाबदारी असलेले कर्मचारी नेमके कुठे होते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
एसएनसीयू विभागात कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार केले जातात. त्यामुळे या विभागात अत्याधुनिक आणि सुरक्षित यंत्रणा असणे आवश्यक मानले जाते. मात्र या घटनेनंतर रुग्णालयातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, विद्युत यंत्रणेतील दोष किंवा इतर कोणते कारण होते, याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Video : वारंवार मागण्या का बदलता अन् उपोषण का करता?, मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं
घटनेनंतर प्रशासनाने इतर कक्षांतील बालकांनाही सुरक्षिततेच्या कारणास्तव सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवले आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. निष्पाप तीन नवजात बालकांचा जीव गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून या घटनेबद्दल सर्व स्तरातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
आता या प्रकरणात रुग्णालय प्रशासन आणि राज्य सरकार कोणती भूमिका घेते, चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि जबाबदारांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
