पोहण्याचा आनंद ठरला जीवघेणा! बहिण-भावासह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू
या घटनेमुळे अमरावती शहरासह परिसरात शोककळा पसरली असून, मृतांमध्ये दोन बहिण-भावांचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Four people drowned in a lake : अमरावती जिल्ह्यात रविवारी घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा धातखेडा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावती शहरासह परिसरात शोककळा पसरली असून, मृतांमध्ये दोन बहिण-भावांचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या धातखेडा तलाव परिसरात ही घटना घडली. मृतांची नावे सोनाली नरेंद्र जोशी, आदित्य नरेंद्र जोशी, पायल बबलू पंडीत आणि यश गजानन काकणे अशी आहेत. हे सर्वजण खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. काही वेळातच ही घटना गंभीर स्वरूप धारण करत चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाची डीआरएफ टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पुढील तपास सुरू केला आहे. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड शोक व्यक्त केला जात असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदण्याचा डाव, बंगळुरुत कार्यक्रमाच्या बाजुला सापडली स्पोटकं
या घटनेनंतर काही तासांतच आणखी एक हृदयद्रावक घटना देवबाग बीच येथे समोर आली. समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दर्श दत्तात्रय चोपडेकर हा 9 वर्षीय मुलगा समुद्रात बुडू लागला. मुलाचा जीव धोक्यात असल्याचे पाहताच रावजी उर्फ काका अवधूत चोपडेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, बचावकार्यादरम्यान त्यांच्या श्वसननलिकेत मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून मालवण पोलिसांनी नोंद केली आहे. रावजी चोपडेकर यांच्या धाडसामुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला असला, तरी स्वतःचा जीव गमवावा लागल्याने देवबाग गावावर शोककळा पसरली आहे.
एका बाजूला अमरावतीतील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला देवबाग येथे जीव वाचवताना तरुणाचा मृत्यू या दोन घटनांनी राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जलाशय आणि समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव या घटनांनी करून दिली आहे.