Video : चर्चा तर करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन; वेळ सांगत शाहांचं विरोधकांना खुलं आव्हान
Amit Shah On Parliament Monsoon Session सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी संसदेत तयार आहे.
Amit Shah On Parliament Monsoon Session : संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे. विरोधक तयार असतील तर आज दुपारी 3 वाजल्यापासून चर्चेला सुरुवात करू. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी तयार आहे, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. संसदेचं कामकाज वारंवार ठप्प होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी विरोधकांना चर्चेसाठी थेट आवाहन केलं. विरोधकांनी दुपारी 2 वाजेपर्यंत पत्र द्यावं. आम्ही प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून चर्चेसाठी वेळ देण्यासही तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
Share Market : चंद्रशेखरन यांचा राजीनामा येताच टाटा कंपन्यांचे शेअर्स घसरले; कोट्यवधींचे नुकसान
आज 3 ते उद्या 3 वाजेपर्यंत चर्चा करू
अमित शाह यांनी चर्चेसाठी तब्बल 24 तासांचा प्रस्ताव दिला. विरोधक तयार असतील तर आज दुपारी 3 वाजल्यापासून उद्या गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत चर्चा करू. मात्र, आधी विरोधकांनी चर्चेसाठी तयार व्हावं, असं ते म्हणाले. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगताना शाह म्हणाले, तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. प्रत्येक मुद्दा ऐकेल आणि एक-एक गोष्टीचं उत्तर देईन असे शब्दही शाह यांनी दिला.
संसद चालत नसेल तर जाण्याचा काय फायदा?
संसदेतील गतिरोधावर नाराजी व्यक्त करत अमित शाह यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. विरोधक संसद चालू देत नाहीत. गंभीर मुद्द्यांवर अशा प्रकारे चर्चा होऊ शकत नाही. संसद चालत नसेल तर तिथे जाण्याचा काय फायदा? असा सवाल त्यांनी केला. तसंच, लापता, भाग गए… अशा प्रकारची भाषा योग्य नाही. चर्चेसाठी वेळ निश्चित केला जावा, असंही शाह यांनी स्पष्ट केलं.
चर्चेपासून कोण पळतंय, हे जनतेने ठरवावं
संसदेतील गतिरोधाची जबाबदारी नेमकी कोणाची, यावरही अमित शाह यांनी विरोधकांना घेरलं. आता जनतेने ठरवावं की चर्चेपासून कोण पळत आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांसमोर चर्चेचं आव्हान ठेवलं. दरम्यान, शाह यांच्या या प्रस्तावानंतर संसदेतील गतिरोध संपणार का आणि विरोधक या चर्चेच्या प्रस्तावाला काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
संसदेत गदारोळ का?
दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी अमित शाह यांनी संसदेत उत्तर द्यावं, अशी विरोधकांची मागणी आहे. त्यावरून संसदेत सातत्याने गोंधळ होत असून कामकाजावर परिणाम झाला आहे. मान्सून अधिवेशनाचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात सरकार आणि विरोधकांमध्ये चर्चेचा मार्ग निघतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारने यापूर्वीच अमित शाह उत्तर देण्यास तयार असल्याचा दावा केला होता. मात्र, विरोधकांनी दिल्लीतील लाठीचार्ज आणि राम मंदिर या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा हवी, अशी भूमिका घेतली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर तडजोड होणार नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे. आता अमित शाह यांच्या 24 तासांच्या चर्चेच्या प्रस्तावावर विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO | Parliament Monsoon Session: Union Home Minister Amit Shah, says, "Words like 'missing' and 'fugitives' are terms that have only recently begun to be heard in India’s public and parliamentary discourse. Ever since the Parliament session began, I have been coming regularly… pic.twitter.com/hnmEstw0CB
— Press Trust of India (@PTI_News) August 12, 2026