62nd Maharashtra State Marathi Film Awards : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. या पुरस्कारांमध्ये ‘छबिला’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला, तर ‘घरत गणपती’ द्वितीय स्थानी तर ‘नाच गं घुमा’ तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला.
या सोहळ्यात विविध गटातील महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार, संगीत दिग्दर्शक व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ पटकथालेखक, अभिनेते व निर्माते सलीम खान यांच्या वतीने त्यांच्या पत्नी हेलन यांनी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला, तर अभिनेत्री डॉ. राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, महाराष्ट्र विधान परिषदेचे उप सभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पुरस्कारप्राप्त कलाकार तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाची निर्मिती असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चरित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या चरित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
UNESCOच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांसह अन्य ३ अशा एकूण १५ गडकिल्ल्यांच्या इतिहास, वैभव आणि वैशिष्ट्यांवर आधारित ‘दुर्गगाथा शिवरायांची’ हा विशेष माहितीपट महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित यांच्या निर्मितीतून साकारण्यात येणाऱ्या या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा गौरवशाली दुर्गवारसा जगभर पोहोचविण्यात येणार आहे.
• सर्वोत्कृष्ट अभिनेता सुनील बर्वे आणि गश्मीर महाजनी (विभागून)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्वाती गोतावळे
• उत्कृष्ट कला दिग्दर्शन – संतोष फुटाणे, महेश कोरे,
• उत्कृष्ट छायालेखन – महेश आणे, महेश लिमये,
• उत्कृष्ट संकलन -अभिजित देशपांडे, विजय कलमकर,
• उत्कृष्ट ध्वनीमुद्रण सतीश दडस
• उत्कृष्ट ध्वनी संयोजन – संजय चतुर्वेदी,
• उत्कृष्ट वेशभूषा- गणेश लोणारे, शिवाजी करडे,
• उत्कृष्ट रंगभूषा – संजय सिंग, संतोष गिलबिले
• उत्कृष्ट बालकलाकार म्हणून सावित्रीच्या लेकी चित्रपटातील धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडागळे, एंजल कालीकुरी
• सर्वोत्कृष्ट कथा – जयंत सोमलकर (स्थळ)
• उत्कृष्ट पटकथा – अमरजीत आमले (कुर्ला टू वेंगुर्ला)
• उत्कृष्ट संवाद – राम खाटमोडे, विनोद वणवे ( नवरदेव BSC Agri)
• उत्कृष्ट गीत – रॉकसन (नवरदेव BSC Agri)
• उत्कृष्ट संगीत- अक्षय खोत (कुर्ला टु वेंगुर्ला)
• उत्कृष्ट पार्श्वसंगीत- संतोष मुळेकर(संगीत मानपमान)
• उत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे (लग्नकल्लोळ)
• उत्कृष्ट पार्श्वगायिका- राजेश्वरी पवार(सजना)
• उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – उमेश जाधव (फुलवंती)
• उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – रितिका श्रोत्री (मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी)
• उत्कृष्ट विनोदी अभिनेता – अमेय परब (कुर्ला टू वेंगुर्ला)
• सहायक अभिनेता- तारानाथ खिरतकर(स्थळ), जनार्दन कदम (घात) विभागून
• सहायक अभिनेत्री – नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता, आदीश वैद्य
• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री – भक्ती घोगरे
• प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन – अनिल भालेराव (छबिला)
• प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – निर्मिती संस्था अ स्केअर ग्रुप (भुंडीस)
• भालजी पंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अनिल भालेराव (छबीला)
• राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक – नवजोत बांदिवडेकर (घरत गणपती)
• राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांक – परेश मोकाशी (नाच ग घुमा)
• कै. व्ही शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट – स्थळ
• कै. दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – जयंत सोमलकर – स्थळ
• कै. दादा कोंडके ग्रामिण प्रश्न हाताळणारा चित्रपट नवरदेव BSC AGRI
• कै. अनंत माने ग्रामिण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – रामचंद्र खाटमोडे (नवरदेव BSC AGRI)
