अभिजीत दिपकेंना न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर, वर्षभर शांतता राखण्याचं हमीपत्र द्यावं लागणार

सुमारे वर्षभर शांतता राखण्याच्या अटीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित बॉण्डवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका केली जाईल.

Untitled Design   2026 10 17T174305.065

Untitled Design 2026 10 17T174305.065

Abhijit Dipke granted conditional bail by the court : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जामीन मंजूर झाला असून, आवश्यक बॉन्डवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपक यांना जामिनासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये सुमारे वर्षभर शांतता राखण्याच्या अटीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित बॉण्डवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका केली जाईल आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, दिपके यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलाम 126 आणि 170 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शांताताभंग रोखणे आणि संभाव्य दखलपात्र गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑनलाइन बेटिंग अन् सायबर फसवणुकीवर ईडीची मोठी कारवाई, मुंबई-पुण्यासह 5 शहरांत 20 ठिकाणी छापेमारी

दरम्यान, कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ निषेध कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी अभिजीत दिपके आणि एआयएसएच्या नेत्या नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम 65 अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेहा बोरा यांची सुटका करण्यात आली होती. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे तिरंगा फडकवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिपके यांनी केले होते. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस बजावली.

नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांच्या अधिकारांवर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असा इशारा या नोटिशीतून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दिपके यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नेहा बोरा यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली होती. पोलिसांकडून आंदोलकांशी अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलकांना दिवसा किंवा संध्याकाळी ताब्यात घेऊन रात्रभर कोठडीत ठेवले जाते आणि त्यानंतर त्यांची सुटका केली जाते, असा दावा त्यांनी केला.

पोटाची खळगी कशी भरणार? रोजगार हमी योजनेचं मराठवाड्यातील भयाण वास्तव; मजुरीत कधी अन् किती रुपयांची वाढ?

तसेच, आंदोलकांना रात्रभर कोठडीत ठेवण्याची परवानगी कोणत्या कायद्यानुसार किंवा आदेशानुसार दिली जाते, असा सवालही बोरा यांनी उपस्थित केला. विशेषतः महिलांच्या सुटकेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जात नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. अभिजीत दिपके यांच्या जामिनानंतर आता आवश्यक अटींची पूर्तता झाल्यावर त्यांची सुटका कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, त्यांच्या सुटकेबाबतची अंतिम स्थिती संबंधित अधिकृत पुष्टीवर अवलंबून असेल.

Exit mobile version