ऑनलाइन बेटिंग अन् सायबर फसवणुकीवर ईडीची मोठी कारवाई, मुंबई-पुण्यासह 5 शहरांत 20 ठिकाणी छापेमारी
ईडीच्या मुंबई विभागाच्या झोन-2 पथकाने 13 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, मेहसाणा, सुरत आणि हैदराबाद या पाच शहरांमधील एकूण 20 ठिकाणी छापेमारी केली.
Major action by the ED against online betting and cyber fraud : ऑनलाईन बेटिंग, गेमिंग आणि सायबर फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ईडीच्या मुंबई विभागाच्या झोन-2 पथकाने 13 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, मेहसाणा, सुरत आणि हैदराबाद या पाच शहरांमधील एकूण 20 ठिकाणी छापेमारी केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा संबंध ऑल पॅनल एक्स्चेंज आणि एमजीएम91 या ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्मशी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तक्रारदारांना पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले जात होते आणि त्यानंतर त्यांच्या आर्थिक फसवणूक केली जात होती.
ईडीच्या तपासानुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक झालेल्या नागरिकांकडून जमा केलेली रक्कम विविध म्यूल बँक खात्यांमधून वळवण्यात आली. त्यानंतर ही रक्कम पुण्यातील एका संस्थेच्या बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे. ही संस्था राम यु. रामधन यांनी स्थापन केली होती. तसेच, एडसम फिनटेकशी संबंधित आय पैसा नावाचे अंतर्गत पेमेंट प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले होते. या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग, बेटिंग आणि सायबर फसवणुकीत सहभागी असलेल्या विविध संस्थांसाठी विविध संस्थांसाठी आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा संशय आहे.
लंके – शिंदेंची भेट…जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार का? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तपासादरम्यान, या रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर म्यूल बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचं देखील उघड झालं आहे. या खात्यांचे नियंत्रण करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यात आली आहे. काही सहकारी बँकांच्या पायाभूत सुविधांचा वापर करून गुन्ह्यातून मिळालेला पैसा जमा करणे आणि पुढील स्तरावर वळवणे, असे प्रकार झाल्याचे ईडीने म्हटले आहे. गुन्ह्यातून मिळालेली रक्कम पुढे वळवण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये बनावट व्यापार व्यवहार आणि जादा बिलिंग, म्यूल खात्यांमधून रोख रक्कम काढणे, तसेच भारताबाहेर पैसा पाठवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करणे, या पद्धतींचा समावेश आहे.
छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी विविध कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. याशिवाय, संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या अनेक बँक खात्यांवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी पुणे, मुंबई आणि बंगळुरू येथेही ईडीने छापेमारी केली होती. तसेच, एडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक राम यू. रामधनी यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बरसण्याचा अंदाज
दरम्यान, ऑनलाइन बेटिंग, गेमिंग आणि सायबर फसवणुकीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बेकायदेशीर आर्थिक जाळ्यांचा शोध घेऊन ते उद्ध्वस्त करण्यासाठी तपास सुरू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.