सरकारच्या आश्वासनांवर विश्वास नाही? अभिजीत दिपके म्हणाले, राजीनामा होईपर्यंत संघर्ष सुरू राहील

अभिजित दिपके यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार देत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे सांगितले आहे.

Untitled Design (87)

Untitled Design (87)

Abhijit Dipke’s major announcement : नीट परीक्षा वाद, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. तब्बल 26 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. भारतीय संसदेत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकार तसेच विविध राजकीय पक्षांच्या खासदारांकडून मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

याशिवाय, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित घटनांमध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसानभरपाई देण्यात येईल, तसेच शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, अशी हमी सरकारने दिल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेले आंदोलन थांबणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती.

मात्र, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार देत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे सांगितले आहे. अभिजित दिपके म्हणाले, सोनम सर यांनी 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतल्याचा आम्हाला दिलासा आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे देशभरातील जनतेचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच राहील.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सचिन तेंडुलकरांची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या भावनांना दिला आवाज

सीजेपीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सोनम वांगचुक यांच्या संघर्षाचे कौतुक करण्यात आले आहे. आपल्या असामान्य धैर्याने आणि त्यागाने आपण संपूर्ण राष्ट्राची सदसद्विवेकबुद्धी जागृत केली. देशासाठी आपले जीवन अत्यंत मौल्यवान आहे, असे म्हणत पक्षाने त्यांचे आभार मानले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री एक व्हिडिओ संदेश जारी करून आपली भूमिका मांडली. शुक्रवारी होणाऱ्या केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. त्यानंतर आता शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच सीजेपीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे नीट परीक्षा वाद, विद्यार्थ्यांचा रोष आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा आगामी काळात संसदेसह देशाच्या राजकीय केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Exit mobile version