झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक उपोषणावर; अभिजीत दिपकेचा आंदोलनाला पाठींबा
JPSC Paper Leak प्रकरणावरून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. परीक्षा रद्द करून CBI चौकशी करण्याची मागणी.
Jharkhand Student Protest; Abhijit Dipke Extends Support: झारखंडमध्ये विद्यार्थी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांचे आंदोलन आता चांगलेच तीव्र झाले आहे. 14 व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) संयुक्त नागरी सेवा परीक्षेत कथित पेपरफुटी, OMR शीटमध्ये फेरफार आणि इतर अनियमितता झाल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि परीक्षार्थी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. रांचीतील जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये 29 जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता उपोषणाची जोड मिळाली आहे.
14व्या JPSC नागरी सेवा परीक्षेची प्राथमिक परीक्षा 19 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर 2 जुलै रोजी निकाल जाहीर झाला. निकालानंतर परीक्षेच्या प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले. प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप, OMR शीटमध्ये कथित फेरफार आणि निकाल प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे दावे आंदोलकांकडून करण्यात येत आहेत. मात्र, हे आरोप अद्याप आरोपांच्या स्वरूपात असून त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासातूनच समोर येणार आहे.
परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी
आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी म्हणजे 14वी JPSC प्राथमिक परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फत नव्हे तर CBI कडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी JPSC आणि JSSCच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. परीक्षेच्या आयोजनाशी संबंधित खासगी एजन्सीच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. OMR शीटमध्ये ‘Not Attempted’ असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओच्या वादा दरम्यान मार्क झुकरबर्गने माफी मागितली पण… प्रकरण वेगळच
उपोषणामुळे आंदोलनाला धार
29 जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप घेतले आहे. विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांनी 2 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यानंतर आणखी पाच जण उपोषणात सहभागी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दबाव वाढला आहे. आंदोलकांचा राज्य सरकारच्या CID चौकशीवरही आक्षेप आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी, यासाठी CBI तपासाची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात CIDने तपास सुरू केला असून काही जणांना अटक करण्यात आल्याचेही वृत्त आहे. माजी JPSC अध्यक्षांचीही चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अभिजित दीपके यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा
दरम्यान, महाराष्ट्रातील कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची चर्चा महाराष्ट्रातही सुरू झाली आहे. दीपके यांनी आंदोलक विद्यार्थी नेत्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा दिला आहे.
Spoke to the students who are protesting in Jharkhand over irregularities in JPSC and JSSC recruitment exams.
The CJP stands with all the students in Jharkhand and support their demands. pic.twitter.com/lLSRhFVpv1
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 2, 2026
JPSC मुख्य परीक्षा पुढे ढकलली
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर JPSCची संयुक्त नागरी सेवा मुख्य परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार आणि आयोग काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.