गडचिरोलीतील आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, तीन विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणात कारवाई

मुख्यमंत्र्यांनी संबंधित आश्रमशाळेची तपासणी करून सकारात्मक अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले.

Untitled Design (33)

Untitled Design (33)

Action taken in the case of the three female students’ deaths : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. आश्रमशाळेतील वसतिगृहात झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना एकाचवेळी सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत तीन निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी रात्रीचे जेवण करून वसतिगृहात झोपल्या होत्या. त्यावेळी विषारी सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केला. विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल यांचा धानोरा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. तर इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. उर्वरित तीन विद्यार्थिनींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्यावर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे.

या अत्यंत दुर्दैवी घटनेचे पडसाद थेट मंत्रालयात उमटले. मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. आश्रमशाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित आश्रमशाळेची तपासणी करून सकारात्मक अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्याआयुर्वेदिक औषध क्षेत्रातील 10 कंपन्यांवर एफडीएकडून कायमस्वरूपी बंदी

आदिवासी विकास मंत्र्यांनीही या घटनेवर संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेल्या नेतृत्वाशी संबंधित संस्थेकडून चालवली जाणारी आश्रमशाळा अशा प्रकारे निष्काळजीपणे चालवली जात असेल आणि लहान विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी खेळ होत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

तपासादरम्यान संबंधित आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता, वॉर्डनची अनुपस्थिती तसेच शासनाकडून अनुदान मिळूनही आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच केवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या आश्रमशाळांची पाहणी न करता दुर्गम आणि अंतर्गत भागातील आश्रमशाळांचीही नियमित व सखोल तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

या घटनेमुळे राज्यातील निवासी आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version