Ajay Baraskar hits back at Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वाताववरं चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर खुलासा करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे यांच्यासाठी 500 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या कथित क्लिपची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नाही.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर अजय बारस्कर यांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देताना अजय बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले. आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, पण डोंगर पोखरून उंदीर काढला. अशी फडतूस क्लिप दाखवण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय? आठ महिने त्यांनी ही ऑडिओ क्लिप का दाखवली नाही? असा सवाल बारस्कर यांनी केला.
क्लिपमध्ये भाजपचेच लोक, चौकशी करा ; रामदास कदम स्पष्टच म्हणाले
यावेळी अजय बारस्कर यांनी आपल्याकडेही एक ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला. ते म्हणाले, मनोज जरांगेंबद्दल माझ्या फोनमध्येही एक क्लिप आहे. तुम्ही जशी क्लिप दाखवली, तशीच एक क्लिप माझ्या मोबाईलमध्येही आहे. मनोज जरांगे पाटील यांचे दोन जवळचे मित्र आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये ते दोघे चर्चा करत आहेत. बारस्कर यांच्या दाव्यानुसार, या कथित क्लिपमध्ये जरांगे यांच्या मित्रांमध्ये पैशांच्या व्यवहारासंदर्भात चर्चा झाल्याचा आरोप आहे. या क्लिपमध्ये ते दोघे म्हणतात, ‘काय राव, जरांगेंनी काय माल पटवलाय, पिंपरी-चिंचवडमधला माल आहे.’ हे मी बोलत नाही, तर जरांगे पाटील यांचे मित्र बोलत आहेत, असा दावा बारस्कर यांनी केला.
पुढे बोलताना बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्या जवळच्या मित्रांच्या भेटीगाठी आणि दौऱ्यांचाही उल्लेख केला. बंद खोलीमध्ये रात्रभर तुम्ही नेमकी काय चर्चा करता? तुम्ही एकत्र फिरता. तुमच्या दौऱ्यांमध्येही ते असतात. तुम्ही पुण्यात आलात किंवा रायगडला गेलात, तरी ते तुमच्यासोबत असतात. माझ्याकडे क्लिप आहे. तुम्ही माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, मग मी ही ऑडिओ क्लिप पोलिसांना देतो, असं बारस्कर म्हणाले.
मनोज जरांगे यांनी सादर केलेली कथित ऑडिओ क्लिप आणि अजय बारस्कर यांनी केलेले प्रत्यारोप यामुळे हे प्रकरण आता अधिक चर्चेत आलं आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी करण्यात आलेले दावे आणि कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे.
