क्लिपमध्ये भाजपचेच लोक, चौकशी करा ; रामदास कदम स्पष्टच म्हणाले
Ramdas Kadam On Manoj Jarange : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे
Ramdas Kadam On Manoj Jarange : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तर याचा पुरावा म्हणून एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली आहे.
ऑडिओ क्लिप व्हायरल होताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोठा खुलासा केला आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, मनोज जरांगे पाटीलसाहेब आज तुम्ही जी ऑडियो क्लिप दाखवली आहे ती क्लिप दोन वर्ष जुनी आहे. तुम्ही ही क्लिप दोन वर्ष का ठेवली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज उपमुख्यमंत्री आहे त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मोठा योगदान दिलं आहे. माझी लेखी मागणी असेल आजच्या आज, त्या क्लिपची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. ही जी महिला म्हटली, डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) मार्फत आम्ही पैसे पोहोचवलोय म्हणून मग ती महिला कोण आहे? पैसे कुठं दिले? याची चौकशी झाली पाहिजे. क्लिप बाहेर काढून एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पुढे बोलताना कदम म्हणाले की, अडीच वर्षे झाली या क्लिपला. ही क्लिप आत्ताच कशी बाहेर पडली? त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या. मग तेव्हा ही क्लिप बाहेर का नाही आली? क्लिपमध्ये हे जे तीन- चार लोक जे बोलतायत ते भाजपचेच आहेत त्याबद्दल काही दुमत नाही असं देखील शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले.