छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ! पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, तीन आरोपी अटकेत

शिवसेना नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Untitled Design   2026 11 13T073431.196

Untitled Design 2026 11 13T073431.196

Attempted attack on Guardian Minister Sanjay Shirsat’s house : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराच्या दिशेने बाटल्या फेकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त करत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या घटनेबाबत बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, रात्री काही व्यक्तींनी त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्यांची गाडी पडली, त्यानंतर त्या पुन्हा परत येऊन घराच्या गेटजवळ आल्या. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अनेक ओएसडी आपल्या खिशात असल्याची आणि आपले कोणीही काही करू शकत नसल्याची भाषा केली.

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे असल्याचा दावाही शिरसाट यांनी केला. पालकमंत्र्यांच्या घरावरच अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या ड्रग्जची विक्री होत आहे, खुनाच्या घटना घडत आहेत; मात्र पोलीस प्रशासन या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या प्रकरणाची तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रात्री बारा वाजताही आपला फोन उचलतात, मात्र शहरातील पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी संपर्कात येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सध्याच्या पोलीस आयुक्तांची तातडीने बदली झाली पाहिजे, अशी ठाम मागणीही शिरसाट यांनी केली. शहरात वसुली नव्हे, तर शांतता आणि सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

या घटनेदरम्यान त्यांचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहितीही संजय शिरसाट यांनी दिली. संबंधित कार्यकर्त्याला नखाने दुखापत झाली असून तो वैद्यकीय तपासणीसाठी गेला असल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांकडे शस्त्र असते, तर एखाद्याचा जीवही गेला असता, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपण हल्ल्याला घाबरत नाही; मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांचाही जीव धोक्यात असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याचे शिरसाट म्हणाले.

सिंहगड संस्थेला मोठा धक्का! सात कॉलेजचा कारभार सरकारच्या ताब्यात, प्रशासक नियुक्त

या संपूर्ण प्रकरणावर आणि शहरातील पोलीस प्रशासनाच्या कारभारावर संजय शिरसाट सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते हल्ल्याच्या घटनेबाबत सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्या बदलीच्या मागणीवरही ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय कारवाई करते आणि मुख्यमंत्र्यांकडून या तक्रारीची कशी दखल घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version