Brent Crude Oil Price: मध्य पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती आणखी भडकण्याची शक्यता आहे. FGE च्या (Facts Global Energy) ‘मिडल ईस्ट अँड आशिया’ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष इमान नासेरी यांच्या मते, पुरवठ्यातील व्यत्यय कायम राहिल्यास ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 120 ते 150 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. सध्या ब्रेंट क्रूडचा दर 107 डॉलरच्या पुढे गेला असून, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सलग दुसऱ्या दिवशी तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
ऊस उत्पादकांपासून साहित्य क्षेत्रापर्यंत दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
सौदी अरेबियातील ‘ईस्ट-वेस्ट’ पाइपलाइन बंद असल्याने बाजारातील चिंता वाढली आहे. या पाइपलाइनमधील अडथळा दीर्घकाळ कायम राहिल्यास तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. नासेरी यांच्या मते, दररोज आणखी 20 ते 40 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यास बाजारावर मोठा दबाव निर्माण होईल. काही ठिकाणी प्रत्यक्ष उपलब्ध तेलाचे व्यवहार आधीच 120 ते 130 डॉलर प्रति बॅरल या दराने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष बाजारात तुटवड्याचे संकेतही दिसत असून, तातडीने उपलब्ध होणाऱ्या तेलाच्या मालावर 20 ते 30 डॉलरपर्यंत प्रीमियम आकारला जात आहे. पुरवठ्यातील अडथळे कायम राहिल्यास ब्रेंट फ्युचर्समधील तेलाचे दरही प्रत्यक्ष बाजारातील दरांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. सौदीची पाइपलाइन दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बंद राहिली, तर ब्रेंट फ्युचर्समध्ये आणखी मोठी तेजी दिसू शकते, असा अंदाज नासेरी यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल; 130 नेत्यांची यादी तयार, राहुल गांधी कुणाला देणार संधी?
सौदी अरेबियाने खबरदारीचा उपाय म्हणून पाइपलाइन बंद केली असून, यानबू येथील तेलसाठ्यामुळे पुढील 15 ते 25 दिवस जहाजांमध्ये तेल भरण्याचे काम सुरू ठेवता येऊ शकते. मात्र, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील वाहतुकीवरील धोका, काही तेलक्षेत्रांचे बंद होणे आणि अमेरिका-इराण संघर्षाचा विस्तार यामुळे पुरवठ्याची चिंता कायम आहे.
दरम्यान, ETO Marketsचे मुख्य गुंतवणूक अधिकारी जोनाथन बॅरेट यांच्या मते, परिस्थिती अधिक बिघडल्यास कच्च्या तेलाचा दर 125 ते 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. संघर्षावर तोडगा निघेपर्यंत तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार राहण्याची शक्यता असून, बाजारात ‘रिस्क प्रीमियम’ कायम राहू शकतो. त्यामुळे पुढील काळात मध्य पूर्वेतील घडामोडी आणि तेलाचा पुरवठा हेच कच्च्या तेलाच्या दराची दिशा ठरवणारे प्रमुख घटक ठरणार आहेत.
