काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल; 130 नेत्यांची यादी तयार, राहुल गांधी कुणाला देणार संधी?
Rahul Gandhi : सत्ताधारी भाजपनंतर आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये देखील मोठे बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
Rahul Gandhi : सत्ताधारी भाजपनंतर आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये देखील मोठे बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. काँग्रेसचे नेतृत्व सध्या जेष्ठ नेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेत असून पुढील काही दिवसात तरुण आणि सक्रिय नेत्यांवर संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या सुमारे 130 नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Congress) एआयसीसी स्तरावर महत्तपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहेत. सध्या असणाऱ्या सरचिटणीसांपैकी निम्म्या सरचिटणीसांना बदलले जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. संघटनेत सक्रिय असलेले, तळागाळात काम करण्यास सक्षम आणि निवडणुकीच्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकट करण्याची क्षमता असलेले नेते यांना संधी देण्यावर पक्षाचा भर आहे.
130 इच्छुकांची छाननी
या प्रक्रियेअंतर्गत, गेल्या आठवड्यात सुमारे 130 संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात आली. 7 सप्टेंबरपासून सुरू झालेली मुलाखतींची फेरी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पार पडली. प्रत्येक नेत्यासाठी आधीच सविस्तर माहिती-पत्रके (डोसियर्स) तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांच्या तळागाळातील हालचाली, मागील कामगिरी, संघटनात्मक कार्य आणि निवडणुकीतील कामगिरीचा सर्वसमावेशक तपशील समाविष्ट होता.
मुलाखतीदरम्यान, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी कमकुवत राहिली आहे, तिथे जबाबदारी मिळाल्यास संघटना बळकट करण्यासाठी ते कोणती रणनीती अवलंबतील, याबद्दल नेत्यांना विचारणा करण्यात आली. तसेच, आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक राजकीय मुद्दे आणि पक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याच्या योजनांबाबतही प्रश्न विचारण्यात आले.
काँग्रेसमध्ये सध्या 64 एआयसीसी सरचिटणीस
सध्या काँग्रेस पक्षात 64 एआयसीसी सरचिटणीस आहेत. यापैकी अनेकांवर विविध राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते संबंधित एआयसीसी (AICC) सरचिटणीस किंवा राज्यांचे प्रभारी यांच्याशी समन्वय साधून काम करतात. त्यांच्या भूमिकेत राज्य काँग्रेस शाखांच्या संघटनात्मक कामकाजावर देखरेख करणे, स्थानिक शाखांना सहकार्य करणे आणि पक्षाचे कार्यक्रम पुढे नेणे यांचा समावेश असतो. दरम्यान, काही एआयसीसी सचिव दिल्लीतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांच्या कार्यालयांशी संलग्न असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या नवीन जबाबदाऱ्यांसाठी नेत्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. मुलाखत प्रक्रियेदरम्यान सुमारे 12 ते 14 उमेदवारांची निवड (शॉर्टलिस्ट) करण्यात आली. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांनी उमेदवारांना त्यांच्या मागील संघटनात्मक कामाबद्दल, अनुभवाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल सविस्तर प्रश्न विचारले. सर्व उमेदवारांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर, पक्ष लवकरच सचिवांच्या नवीन टीमची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, गाडीत बसताच अश्रू अनावर, म्हणाले, मला मारायचं तर…
‘द इंडियन एक्सप्रेस’ ने दिलेल्या माहितीनुसार, मुलाखत प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका नेत्याने सांगितले की, सुरुवातीला उमेदवारांना साधारण एका मिनिटात स्वतःची ओळख करून देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि के.सी. वेणुगोपाल यांनी त्यांच्या संघटनात्मक भूमिका आणि आतापर्यंत केलेल्या कामाबाबत प्रश्न विचारले. नेत्यांना त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या, त्यांच्या निर्णयामागील तर्क काय होता, पक्षासाठी त्यांचे योगदान काय होते आणि कोणत्या क्षेत्रांत त्यांची कामगिरी चांगली झाली नाही, याबद्दल विचारणा करण्यात आली.