Chhagan Bhujbal on NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विलिनीकरणाबाबत अद्याप आमच्यापर्यंत कोणतीही अधिकृत चर्चा आलेली नाही. आमच्या पक्षातील सर्व नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. नेमकं कोणाला काय हवं आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सर्वजण एनडीएमध्ये जाणार आहेत की इंडिया आघाडीत सहभागी होणार आहेत, याबाबतही संभ्रम आहे. योग्य वेळ आल्यावर सुनेत्रा पवार सर्वांना विश्वासात घेऊन भूमिका स्पष्ट करतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.
विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना भुजबळ यांनी क्रिकेटच्या सामन्याचं उदाहरण दिलं. सध्या मर्जर मर्जरचा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. विलिनीकरण करायचं असेल तर दोन्ही बाजूंनी सांघिक पातळीवर निर्णय घेणं आवश्यक आहे. एखादा खेळाडू वेगळा जातो, तिथे संपूर्ण टीम असते, चर्चा होते आणि काही घडलं नाही तर पुन्हा माघारी येतो, असं चालणार नाही. एकमेकांशी चर्चा करून सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा. कुणीही तुटक तुटक पद्धतीने निर्णय घेऊ नये, असं मत त्यांनी मांडलं.
विलिनीकरणाच्या चर्चांबाबत आम्हालाही प्रसारमाध्यमांमधूनच माहिती मिळत आहे. कोण कोणाला भेटत आहे, कुठे चर्चा सुरू आहे आणि त्यातून काय निष्पन्न होणार आहे, याची आम्हाला कल्पना नाही. माध्यमांकडून जे निष्कर्ष काढले जात आहेत, तेच आम्हीही ऐकत आहोत. त्यामुळे प्रत्यक्षात दोन्ही गटांमध्ये काय सुरू आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांची अजित पवार गटातील आमदार भेट घेत असल्याच्या चर्चेवरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मीदेखील रुग्णालयात आणि त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जाण्यात काहीही गैर नाही. माझ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन महत्त्वाचे नेते आहेत. हे दोघेही माझे मार्गदर्शक राहिले आहेत. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरी शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र, त्यांचा पक्ष वेगळा असून मी वेगळ्या पक्षात आहे, असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांची भेट घेतली असली तरी विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा केली नाही. पवार यांचा स्वभाव असा आहे की, राजकारणात एखादी व्यक्ती त्यांची कितीही मोठी विरोधक असली तरी ते तिच्याशी चांगले संबंध ठेवतात. प्रेमाने संवाद साधतात आणि प्रत्येक बाबतीत राजकीय वैर जपत नाहीत. त्यांच्याकडून आम्हीही ही गोष्ट शिकलो आहोत. राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत, असं भुजबळ यांनी नमूद केलं.
दरम्यान, दोन्ही पवार एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात योगदान दिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नक्कीच आनंद होईल, असं भुजबळ म्हणाले. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या किंवा ठाकरे बंधू एकत्र आले तर जुन्या शिवसैनिकांना जसा आनंद होईल, तसाच आनंद राष्ट्रवादीच्या जुन्या जाणत्यांनाही होईल. शरद पवार आणि मी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यावेळी अनेक जण काँग्रेसमध्ये राहायचं की राष्ट्रवादीत यायचं, या संभ्रमात होते. त्यामुळे काही जण चार महिन्यांनी तर काही जण सहा महिन्यांनी पक्षात आले. अशा परिस्थितीत दोन्ही पवार एकत्र आल्यास जुन्या सहकाऱ्यांसाठी तो आनंदाचा क्षण असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
