CJP claims Dhruv Rathee was detained in Gurugram : दिल्लीतील जंतर-मंतरवर 10 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं नियोजन सीजेपी आणि काही विद्यार्थी संघटनांनी केलं होतं. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली. या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून आंदोलनाशी संबंधित घडामोडींनी राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, प्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ध्रुव राठी याला गुरुग्राममधील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे. मात्र, त्याला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये.
सीजेपीच्या दाव्यानुसार, शनिवारी सकाळी साधारण 8 वाजण्याच्य सुमारास साध्या वेशातील सुमारे 50 पोलीस कर्मचारी ध्रुव रथाच्या निवासस्थानी पोहोचले. एका हिंदी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचं पथक सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी गुरुग्राममधील सेक्टर 56 येथील केंद्रीय विहार परिसरात पोहोचलं होतं. ध्रुव राठीच्या आईने दरवाजा उघडल्यानंतर पोलीस कर्मचारी घरात दाखल झाले आणि त्याला सोबत घेऊन गेल्याचं वृत्त आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे, तसेच त्याला अटक करण्यात आली आहे की केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे, याबाबत स्पष्टता नाही.
सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा
ध्रुव राठीला ताब्यात घेतल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने आपल्या अधिकृत X हँडलवर केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि गप्प राहण्यास नकार देणाऱ्या तरुणांना सरकार घाबरत असल्याचा आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे. मात्र, CJP ने केलेल्या दाव्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नसल्याने या कारवाईबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. ध्रुव राठी हे भारतीय यूट्यूबर, व्हिडिओ क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1994 रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला. राजकारण, सामाजिक प्रश्न, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि समकालीन घडामोडींवर ते व्हिडिओ तयार करतात.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी जर्मनी गाठली. कार्लझूहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि रिन्यूएबल एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्याची माहिती आहे. ध्रुव राठी यांनी सुरुवातीला ट्रॅव्हल व्लॉग आणि पर्यावरणाशी संबंधित विषयांवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांचा कंटेंट राजकीय आणि सामाजिक विषयांकडे वळला. विविध सार्वजनिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या व्हिडिओंमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या मोठ्या नेत्याचा सर्वच पदांचा राजीनामा, भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुमारे 500 निदर्शकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी 50 जणांच्या विरोधात गुन्हेगारी नोंदी असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, या आकडेवारीबाबत अधिकृत पोलीस निवेदनाची खातरजमा आवश्यक आहे. एकीकडे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे, तर दुसरीकडे आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या आणि ध्रुव राठीविरोधातील कारवाईच्या दाव्यांमुळे या प्रकरणाची चर्चा वाढली आहे. ध्रुव राठीला ताब्यात घेण्यामागचं नेमकं कारण आणि दिल्ली पोलिसांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या घडामोडींबाबत स्पष्टता येऊ शकणार आहे.
