सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर (BJP) आज भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून दोन गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावरपर्यंत वीज बिलं आपण माफ केलीत. वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतो. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पावरची जुनं बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत, कधीही कंपनीचा कर्मचारी वसूलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48 हजार कोटींचे जुने बिल माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतोय असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
त्याचबरोबर, कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. कर्जमाफीचे आश्वासन आपण दिलं होतं, राज्यात अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं. पालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या भाजपला भरभरून जनतेनं दिले. राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही, 2029 ला कर्जमाफी करू असा विचार करता आला असता, मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारण्यांसंबंधी नाही. महायुतीचे हे सरकार आहे, देवाभाऊंचे हे सरकार आहे आणि आपण निर्णय घेतला असंही ते म्हणाले.
ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेतला, काही आमदारांशी चर्चा केल्यानंतर मी 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. एकही पैसा आता शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता नाही. मात्र कर्जमाफी अंतिम उपाय नाही. 7-8 वर्षात कर्जमाफी कराव्या लागत असतील तर आपले शेतीप्रश्न कठीण आहेत. कोणी कर्जमाफीतून श्रीमंत झाला नाही. शेतकरी जेमतेम पीक कर्ज काढत असेल आणि ते पण परत करु शकत नसेल तर अडचण आहे असंही ते म्हणाले.
