माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा कासव, टीकाकारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास शैलीत टोलेबाजी

सरकारमध्ये प्रत्येक गोष्ट नेहमीच चांगली चालते असे नाही. त्यामुळे आम्ही सातत्याने फीडबॅक घेत असतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

Untitled Design   2026 09 20T152247.457

Untitled Design 2026 09 20T152247.457

CM Devendra Fadnavis’s signature style of taking digs : नागपूरमधील बुट्टीखोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा ग्रुपच्या कॅम्पसमध्ये आयोजित उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिसखुलास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामकाजापासून कौटुंबिक पाठबळ, मित्रपरिवार, समृद्धी महामार्गाचा प्रवास आणि विरोधकांकडून होणाऱ्या टिकेपर्यंत विविध विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले.

सरकारमध्ये प्रत्येक गोष्ट नेहमीच चांगली चालते असे नाही. त्यामुळे आम्ही सातत्याने फीडबॅक घेत असतो, असे फडणवीस यांनी सांगितले. दिवसभर भेटणारे नागरिक, राज्यात उद्योग उभारणारे उद्योजक तसेच पत्नी आणि मुलगी आपल्याला काम करण्यासाठी सातत्याने ऊर्जा देतात, असे देखील त्यांनी नमूद केले. नागपूरमधील आपल्या मित्रपरिवाराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये आम्ही घरांचा पत्ता विचारत नाही. कोण कोणाच्या घराजवळ राहतो. त्यावरून पत्ता सांगतो. माझे अनेक मित्र असे आहेत की, त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्री नाही. अनेक जण मला एखादी गोष्ट चुकीची वाटली तर स्पष्टपणे हे बरोबर नाही, असे सांगतात.

मोठ्या पदावर गेल्यानंतर अनेकदा स्वतःबद्दल नकारात्मक किंवा चुकीचे काही ऐकण्याची तयारी माणूस ठेवत नाही. मात्र, आपण प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवतो. आपल्या चुका आणि चुकीचे निर्णय देखील जवळच्या लोकांनी आपल्याला सांगितले पाहिजेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महायुतीतील समन्वय आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांबाबत बोलताना फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा प्रवास सांगितला. महायुतीचे सरकार असताना एखादे काम पूर्ण ताकदीने करण्याचा निर्णय घेतला, तर सहयोगी पक्ष देखील मदतीला येतात, असे ते म्हणाले.

मक्कापर्यंत पोहोचला हूतींचा धोका? सौदीसमोर मोठं संकट, पाकिस्तान-तुर्कीची खरी परीक्षा

मी समृद्धी महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सहयोगी पक्षांनी मला सहकार्य केले आणि ते माझ्यासोबत राहिले. मात्र, शरद पवार यांनी या प्रकल्पाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी देखील विरोध केला, त्यावेळी ते आमच्या महायुतीचा भाग होते. तरी देखील मी माझ्या ध्येयावर ठाम राहून काम करत राहिलो, असे फडणवीस यावेळी म्हणाले. समृद्धी महामार्गासाठी अवघ्या एका वर्षात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्या काळात या प्रकल्पाला विरोध करणारे अनेक जण आज त्याच प्रकल्पाचे गुणगान गात आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला.

समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात उभा राहिल्यानंतर विरोधकांची टीका आपोआप थांबली, असं देखील त्यांनी सांगितलं. विरोधक आणि टीकाकारांना आपण कसे सामोरे जातो, याबाबत बोलताना फडणवीस यांनी कासवाचे उदाहरण दिले. माझी चाल कासवाची नाही, मात्र माझी प्रेरणा कासव आहे. जेव्हा माझ्यावर टीका होते, माझ्यावर दगड फेकले जातात, तेव्हा मी कासवाप्रमाणे माझ्या शेलमध्ये जातो. त्या टीकेकडे दुर्लक्ष करतो आणि आपले काम करत राहतो, असे फडणवीस म्हणाले.

टीकेला प्रत्येकवेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम करत राहण्याची आपली पद्धत असल्याचे त्यांनी या उदाहरणातून स्पष्ट केले. प्रशासकीय निर्णय घेताना फीडबॅक स्वीकारणे, जवळच्या लोकांकडून चुका समजून घेणे आणि राजकीय विरोध किंवा टीकेमुळे ध्येयापासून विचलित न होणे, ही आपल्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचे फडणवीस यांच्या संवादातून अधोरेखित झाले.

Exit mobile version