परतीच्या पावसाची चाहूल! महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
महाराष्ट्रातून प्रत्यक्ष मान्सूनची माघार कधी सुरू होणार, याबाबत मात्र हवामान विभागाच्या पुढील अपडेटकडे लक्ष ठेवावं लागेल.
Signs of the retreating monsoon : परतीचा पाऊस तुफान बरसणार का? काही दिवसांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार का? पुढचे काही दिवस हवामान कसं असेल आणि कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ते पाहूया. सगळ्यात आधी सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया. अरबी समुद्रात काही दिवसांपूर्वी तयार झालेली प्रणाली आता सौराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांवर स्थित आहे. पुढच्या 24 तासांत ही प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या तरी तिचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम दिसत नाही.
मात्र दुसरीकडे अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. या भागात चक्रीय वाऱ्यांची स्थितीही पाहायला मिळत असून त्याच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि राज्याच्या काही अंतर्गत भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकतं.
त्याचबरोबर 19 सप्टेंबरपासून मान्सूनच्या माघारीच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर हळूहळू देशाच्या इतर भागांतून मान्सून माघार घेतो. महाराष्ट्रातून प्रत्यक्ष मान्सूनची माघार कधी सुरू होणार, याबाबत मात्र हवामान विभागाच्या पुढील अपडेटकडे लक्ष ठेवावं लागेल.
Sanjay Raut : तुरुंगातले अनुभव, किस्से अन् बरंच काही…’बोध कीर्तन’ पुस्तकातून कोणता गौप्यस्फोट?
आता पुढच्या काही दिवसांचा अंदाज पाहिला तर 18 सप्टेंबरला नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर, कोल्हापूरचा घाट भाग, सिंधुदुर्ग, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र या दिवशी राज्यात व्यापक मुसळधार पावसाचा इशारा नाही.
19 सप्टेंबरला नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर तसेच कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 20 सप्टेंबरपासून पावसाची व्याप्ती काही प्रमाणात वाढण्याची चिन्हं आहेत. विशेषतः हिंगोली, नांदेड, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्येही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे एकूण परिस्थिती पाहिली तर 18 आणि 19 सप्टेंबरला राज्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, तर 20 सप्टेंबरपासून काही भागांत पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. पुढील काही दिवसांत हवामान प्रणालीची दिशा आणि तीव्रता कशी बदलते, यावर महाराष्ट्रातील पावसाचं पुढचं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.