Controversy over ‘Hindutva Murdabad’ slogans : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गोव्याची राजधानी पणजी येथे 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी 300 हुन अधिक अज्ञात आंदोलक आणि सीजेपी समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात पणजी येथे मोर्चा काढण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारल्याचा दावा करण्यात आला आहे. तरी देखील मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आल्याचे समोर आले आहे. या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद, मुर्दाबाद, हिंदुत्व मुर्दाबाद अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. या घोषणांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. दुसरीकडे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही घुसखोरांनी आंदोलनात प्रवेश करून आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा दावा सीजेपीने केला आहे.
या आंदोलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला. रामप्रसाद केळकर यांनी या व्हिडिओच्या आधारे पणजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक धार्मिक असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
‘आयएएस व्हा’ असं मी सांगणार नाही, तरुणाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंचं रोखठोक उत्तर, भूमिका केली स्पष्ट
पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, सार्वजनिक आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह घोषणाबाजी झाल्याच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 196 आणि कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधित आंदोलकांची पाळख पेटवण्याचे काम सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच सांप्रदायिक सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्याला सरकार थारा देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मिळाला असून, आशुतोष रांका आणि सौरव दास न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच पणजीतील आंदोलनासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पक्षाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
