Rahul Gandhi INDIA Alliance March : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या आंदोलनानं जोर धरला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बाराखंभा परिसरातून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेनं मोर्चा घेऊन निघाले. मात्र, भगवान दास रोडवर दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा रोखला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा सुरुवातीला पायी चालत सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेनं जात होते. त्यांच्यासोबत इंडिया आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी भगवान दास रोडवर त्यांना अडवल्यानं आंदोलनाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मतदार यादीतील कथित अनियमिततेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी यावरून विरोधकांनी आंदोलन तीव्र केलं आहे.
