How Many Seats Will Increase In India Afert Delimitation Bill : केंद्र सरकारने परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित संविधान संशोधन विधेयकातील बदलांना मंजुरी दिल्यानंतर देशातील लोकसभा मतदारसंघांच्या आगामी परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशनच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यासाठी 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचे, तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. प्रस्तावित फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ होऊन एकूण जागांची संख्या 850 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील प्रत्येक राज्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढणार असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये खासदारांची संभाव्य संख्या नेमकी कितीने वाढणार याबद्दलचं संभाव्य गणित समजून घेऊया…
Delimitation चा नवा फॉर्म्युला 5 राज्यांसाठी बंपर फायदेशीर ठरणार?; पण कसा?
महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांमध्ये किती जागा वाढणार?
प्रस्तावित परिसीमनानुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या सध्याच्या 48 जागा वाढून 72 होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच राज्याला 24 अतिरिक्त लोकसभा जागा मिळू शकतात. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 80 जागांवरून 120 जागा होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 वरून 63, बिहारमध्ये 40 वरून 60, तर तमिळनाडूमध्ये 39 वरून 59 ते 60 जागा होऊ शकतात. मध्य प्रदेशातील जागा 29 वरून 44 ते 45, कर्नाटकातील 28 वरून 42, गुजरातमधील 26 वरून 39 आणि आंध्र प्रदेशातील 25 वरून 37 ते 38 होण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्येही 25 वरून 37 ते 38 जागा होण्याचा अंदाज बांधला जात आहे.
दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांचे नवे गणित
ओडिशामध्ये लोकसभेच्या सध्याच्या 21 जागा वाढून 31 ते 32 होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 20 वरून 30, तेलंगणामध्ये 17 वरून 25 ते 26, तर आसाम आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 14 वरून 21 जागा होऊ शकतात. पंजाबमध्ये 13 जागांवरून 19 ते 20, छत्तीसगडमध्ये 11 वरून 16 ते 17 आणि हरियाणामध्ये 10 वरून 15 जागा होण्याचा अंदाज आहे. तर, उत्तराखंडमध्ये सध्याच्या 5 जागा वाढून 7 ते 8 आणि हिमाचल प्रदेशमध्ये 4 वरून 6 होऊ शकतात.
ईशान्येकडील छोट्या राज्यांनाही अतिरिक्त प्रतिनिधित्व
ईशान्य भारतातील छोट्या राज्यांच्या लोकसभा जागांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रत्येकी सध्याच्या 2 जागांवरून 3 जागा होऊ शकतात. मिझोराम, नागालँड आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी 1 जागेवरून 2 जागा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या छोट्या राज्यांनाही संसदेत अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळू शकेल असा अंदाज बांधला जात आहे.
डिलिमिटेशन म्हणजे काय?, विधेयक मंजुरीसाठी किती संख्या आवश्यक?, नक्की बदल काय होणार?
केंद्रशासित प्रदेशांमध्येही जागा वाढणार
केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा जागांमध्येही वाढ प्रस्तावित आहे. दिल्लीतील सध्याच्या 7 जागा वाढून 10 ते 11 होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 5 वरून 7 ते 8, तर दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीवमध्ये 2 वरून 3 जागा होऊ शकतात. अंदमान-निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या प्रत्येक केंद्रशासित प्रदेशात सध्याच्या एका जागेऐवजी दोन जागा होण्याचा अंदाज आहे.
महिला आरक्षणाचाही मार्ग मोकळा होणार?
परिसीमनासोबतच महिला आरक्षणाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. प्रस्तावित व्यवस्थेनुसार लोकसभेतील 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्याची तरतूद आहे. लोकसभेची सदस्यसंख्या 850 पर्यंत वाढल्यास त्यापैकी सुमारे 280 जागा महिलांसाठी आरक्षित होऊ शकतात. मात्र, या संदर्भातील अंतिम जागावाटप आणि आरक्षणाची अंमलबजावणी विधेयकातील तरतुदी व पुढील घटनात्मक प्रक्रियेवर अवलंबून असेल. या संविधान संशोधन विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. मात्र, वरील सर्व आकडे डिलिमिटेशन संबंधित प्रस्तावित अंदाज असून, अंतिम प्रक्रिया, घटनादुरुस्ती आणि अधिकृत अधिसूचना पूर्ण झाल्यानंतरच राज्यनिहाय लोकसभा जागांची निश्चित संख्या स्पष्ट होणार आहे.
