Earthquake tremors felt in Nashik : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र थांबताना दिसत नसून शुक्रवारी रात्री घाटमाथ्यावरील परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऐन गणेशोत्सवात नागरिक गणपतीच्या आरतीसाठी एकत्र जमले असतानाच जमीन हादरल्याने एकच घबराट उडाली. अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर आणि मोकळ्या जागेकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 7.19 वाजण्याच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्यावरील डांगराळे, शिंदे दिगर, रोकडपाडा, कुंभीपाडा आणि भरडमाळ परिसरात पहिला धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता अंदाजे 3.4 रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री सुमारे 10.40 वाजता पुन्हा कमी तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. एकाच रात्री दोनदा जमीन हादरल्यामुळे आधीच वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
शिंदे दिगर येथील पोलीस पाटील काशिनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात गणपतीची आरती सुरू असल्यामुळे नागरिक मोकळ्या मैदानात एकत्र आले होते. त्याचवेळी अचानक जमिनीतून जोरदार धक्का जाणवला आणि आवाजही झाला. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही क्षणांसाठी परिसरात धावपळ उडाली. सुदैवाने आरतीमुळे अनेक नागरिक आधीच मोकळ्या जागेत असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाचा अंदाज चुकला? मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी
रोकडपाडा येथील सरपंच गोविंद भोये यांनी या परिसरात सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत परिसरात सुमारे 15 ते 16 वेळा अशा प्रकारचे धक्के जाणवले आहेत. वारंवार जमीन हादरत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढत आहे. भरडमाळ परिसरात यापूर्वी जमिनीला मोठ्या भेगा पडल्याचेही समोर आले असून स्थानिक तलाठ्यांनी या भेगांची पाहणी केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील भनवड ते गोगुळ दरम्यान असलेल्या शिंदपाडा परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरगाणा आणि लगतच्या परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती आहे. सातत्याने होणाऱ्या या भूगर्भीय हालचालींमुळे घाटमाथ्यावरील गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर रोकडपाडा येथील सीताराम खांडवी, रोहिदास वाघमारे, कांतीलाल खांडवी आणि प्रकाश गवळी यांनी तातडीने घराबाहेर पडत इतर नागरिकांनाही सावध केले. नागरिकांनी सुरक्षित आणि मोकळ्या ठिकाणी जावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
