बिबट्याचे वाढते हल्ले… आमदार तांबेनी वनमंत्र्यांनी भेट घेत केली महत्वाची मागणी

Satyajeet Tambe : नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe : नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी आज महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन वनविभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.

अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेक लहान मुले, महिला आणि शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बिबट्या नसबंदीचे धोरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात न राबवता बिबट्यांच्या हॉटस्पॉट असलेल्या सर्व ठिकाणी युद्धपातळीवर आणि गतीने त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली.

याशिवाय संगमनेर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात वाढलेल्या भटक्या जनावरांच्या समस्येकडेही त्यांनी वनमंत्र्यांचे लक्ष वेधले. अपघातग्रस्त, जखमी आणि आजारी जनावरांच्या उपचारासाठी वनविभागाची 1 एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. नाशिक–पुणे महामार्गावरील मौजे कऱ्हे येथील प्राचीन संकटमोचक हनुमान मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. उत्सव व धार्मिक कार्यक्रमांचा विचार करून 3/2 प्रस्तावांतर्गत विशेष बाब म्हणून अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आमदार तांबे यांनी केली.

त्याचबरोबर, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरातील तामकडा धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण कठडे, वाहनतळ, विश्रांती व्यवस्था, स्वच्छतागृह, माहिती केंद्र तसेच पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, बाळासाहेबांचा उल्लेख अन् कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

या सर्व मागण्यांबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विषयांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

follow us