नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे (Nepal Floods) मोठी जीवितहानी झाली असून 160 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याने बचावकार्याला मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पुराच्या पाण्यात घरं, इमारती, वाहनं, जनावरं आणि नागरिक वाहून गेल्याने अनेक भागांमध्ये हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून विविध देशांतील पर्यटक महापुरात अडकले आहेत.
या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारनेही यंत्रणा सक्रिय केली असून नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नेमके किती महाराष्ट्रातील पर्यटक नेपाळमध्ये आहेत आणि ते सध्या कुठं अडकले आहेत, याची माहिती सरकारकडून घेतली जात आहे. पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण परिस्थितीवर सरकारचं लक्ष असल्याचं सांगितलं.
नेपाळमध्ये महापुराचा कहर; आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू, 288 भारतीय नागरिक बेपत्ता
महापुरातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली. महाराष्ट्रातील नागरिकांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांवर मंत्री गिरीश महाजन लक्ष ठेवून आहेत. काही नागरिक तिबेटमध्येही गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांनाही दिल्लीच्या माध्यमातून सुरक्षितपणे परत आणण्यासाठी नियोजन सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नेपाळमधील परिस्थिती पाहता राज्य सरकार सध्या अलर्ट मोडवर असून संपर्क होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक ती मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांबाबत कोणाकडेही माहिती असल्यास ती सरकारपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांचा शोध, त्यांच्याशी संपर्क आणि गरजेनुसार रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
