Shiv Sena Dussehra Rally : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे (Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून दुष्काळ, शेतकऱ्यांना मदत आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केलं. राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना प्रत्यक्ष मदत करण्याची गरज आहे, असं सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. शिवसेनेच्या ६० वर्षांच्या परंपरेचा उल्लेख करत शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचं चित्र आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या असून ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्यांचं दुःख समजू शकतो, असं सांगत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री असताना मदत देण्यासाठी निकष बाजूला ठेवून निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ५ हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही शिंदे यांनी उत्तर दिलं. ही रक्कम तातडीची मदत असल्याचं सांगत त्यांनी कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचं नियोजन केल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंतच्या जबाबदारीत शिवसेना मदतीसाठी पुढे राहील, असंही त्यांनी नमूद केलं. संकटाच्या काळात केवळ भाषणं करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.
टायगर श्रॉफवर हल्ला अन् चमको लगेच बघायला गेले ; शिंदेंवर ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधकांवर टीका करताना शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. शेतकऱ्यांची पिकं करपून जात असताना मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोर्चे काढले जात असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगणाऱ्यांनी किमान बिस्किटाचा पुडा तरी त्यांच्या बांधावर नेऊन द्यावा, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आपल्यावर होणाऱ्या आरोपांना कामातून उत्तर देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना २०१९ मधील सत्तांतराचा मुद्दाही उपस्थित केला.
भाजपच्या नावावर निवडणूक लढवून नंतर महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करणं हा मतदारांचा विश्वासघात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या कृतीला त्यांनी २०१९ मधील सर्वात मोठी ‘व्होटचोरी’ असं संबोधलं. आपल्यावर सातत्याने टीका केली जात असल्याचं सांगत आरोपांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करत, ते आज असते तर सण बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावण्यास सांगितलं असतं, असं शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. दिवाळीचा शिधा देण्याचं काम सुरू असून परभणीत २५ हजार शिलाई मशिनचं वाटप करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली देण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्याचंही त्यांनी नमूद केलं. आर्थिक अडचणीमुळे मुलींची लग्नं करता येत नसलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेना सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं सांगत त्यांनी मदतीची भूमिका पुन्हा मांडली.
