Fadnavis launches a fierce attack on the opposition : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीकडून भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यावेळी झोपला होता का? असा खोचक सवाल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2023 मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करतानाच मतदारसंघ पुनर्रचनेची अट स्पष्ट करण्यात आली होती. त्यावेळी विरोधकांनीही या प्रक्रियेला मान्यता दिली होती. मग आता त्याच मुद्द्यावर विरोध का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक आहे, हे त्यावेळी सर्वांना माहीत होते. मग त्यावेळी झोपला होता का? अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक आता जाणीवपूर्वक वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटणार, महाराष्ट्रावर अन्यायच होणार; राज ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधकांचा विरोध डिलिमिटेशनला नसून महिलांच्या आरक्षणाला आहे, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. वर्षानुवर्षे महिला आरक्षणाचा मुद्दा संसदेत आणायचा आणि नंतर तो संयुक्त समितीकडे पाठवून रखडवायचा, अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना राजकीय प्रतिनिधित्वात 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पुढे आणला आहे. त्यामुळेच विरोधकांकडून या निर्णयाला विरोध केला जात असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. विरोधकांनी आपली दुटप्पी भूमिका सोडून महिलांच्या आरक्षणाला पाठिंबा द्यावा, असेही ते म्हणाले.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय हालचालींना वेग, राहुल, सोनिया गांधी, खरगे स्टॅलिन-पवारांच्या भेटीला
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचनेवरून विरोधकांकडून राज्यांचे प्रतिनिधित्व, लोकसंख्येचे निकष आणि संघराज्य व्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे हा वाद केवळ महिला आरक्षणापुरता मर्यादित न राहता देशातील मोठ्या राजकीय संघर्षाचे स्वरूप घेत आहे. एकीकडे भाजपकडून महिला आरक्षणाला ऐतिहासिक निर्णय म्हणून मांडले जात आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतले जात आहेत.
विरोधक राजकीय हाराकिरी करत असून त्यांनी लबाडी सोडली पाहिजे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे भाजप आणि इंडिया आघाडीमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता फडणवीसांच्या त्यावेळी झोपला होता का? या थेट सवालाला इंडिया आघाडीतील नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
