‘भाऊ, लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र या’; राहुल गांधींचं स्टॅलिन यांना आवाहन, स्टॅलिन म्हणाले, ‘भूमिकेशी तडजोड नाही!’

Rahul Gandhi on MK Stalin: राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन यांना भावनिक साद घातली. त्यावर स्टॅलिन यांनीही उत्तर दिले.

Rahul Gandhi on MK Stalin: राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन यांना भावनिक साद घातली. त्यावर स्टॅलिन यांनीही उत्तर दिले.

Rahul Gandhi on MK Stalin Delimitation Bill: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन (M.K. Stalin) यांना साद घातली आहे. ‘भाऊ, लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र उभे राहा’, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) हे स्वतः स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला रवाना झाले आहेत. त्यापूर्वीच राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन यांना भावनिक साद घातली. त्यावर स्टॅलिन यांनीही उत्तर दिले असून, राज्याचे हित आणि राज्यघटनेच्या संरक्षणाबाबत द्रमुकची (DMK) भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटणार, महाराष्ट्रावर अन्यायच होणार; राज ठाकरेंचा हल्लाबोल

राहुल गांधींचं स्टॅलिन यांना ट्वीटमधून आवाहन

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये एम. के. स्टॅलिन यांना ‘बंधू’ असे संबोधत लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसह आपण स्वतः चेन्नईत येऊन त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी द्रमुकने इंडिया आघाडीसोबत उभे राहावे, अशी विनंतीही त्यांनी केली. स्टॅलिन हे नेहमीच तमिळविरोधी शक्तींविरोधात खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे देशाचे हित, तामिळनाडूचे हित आणि भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे विधेयक पराभूत केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

स्टॅलिन यांचे उत्तर काय?

राहुल गांधी यांच्या आवाहनाला एम. के. स्टॅलिन यांनीही सोशल मीडियावरून उत्तर दिले. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण आणि राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी द्रमुकने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. या योगदानाची दखल घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आभार, असे स्टॅलिन यांनी म्हटले.

तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित हेच द्रमुकसाठी नेहमी सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. राज्यांचे अधिकार, संघराज्य व्यवस्था आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत पक्षाची भूमिका कायम ठाम राहिली आहे. या भूमिकेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.
‘इतिहास आम्हाला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही!’
स्टॅलिन यांच्या ‘इतिहास आम्हाला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही!’ या विधानाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वीरपांडिया कट्टाबोम्मन हे ब्रिटिश सत्तेविरोधात लढणारे शूर योद्धे होते. तर एट्टप्पन हे नाव तमिळ सांस्कृतिक संदर्भात विश्वासघाताचे प्रतीक मानले जाते.

या दोघांचा उल्लेख करत स्टॅलिन यांनी राज्याच्या हक्कांसाठी आणि जनतेच्या हितासाठी द्रमुक कोणतीही तडजोड करणार नसल्याचा संदेश दिल्याचे मानले जात आहे.

महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय हालचालींना वेग, राहुल, सोनिया गांधी, खरगे स्टॅलिन-पवारांच्या भेटीला

दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकावरून द्रमुकची भूमिका नेमकी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी अमित शाह यांनी दक्षिणेतील राजकीय पक्षांशी चर्चा केल्याने द्रमुक या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, राहुल गांधी यांच्या आवाहनाला स्टॅलिन यांनी दिलेल्या उत्तरामुळे इंडिया आघाडीतील राजकीय समीकरणांना पुन्हा महत्त्व आले आहे. आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्टॅलिन काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

follow us