जिममध्ये जाणाऱ्या तरुणांनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्रीवर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

Tukaram Mundhe on Gym Supplements : वैद्यकीय सल्ल्याशिवाय हेल्थ सप्लिमेंट्स घेणाऱ्या तरुणांसह नियमबाह्य विक्री करणाऱ्यांना FDA चा इशारा.

News Photo   2026 11 20T221734.174

Tukaram Mundhe on Gym Supplements

Tukaram Mundhe on Gym Supplements : तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंगची वाढती आवड आणि सोशल मीडियावरून होणाऱ्या आकर्षक जाहिरातींमुळे हेल्थ सप्लिमेंट्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. प्रोटीन पावडर, मल्टीव्हिटॅमिन, वजन कमी करण्याच्या गोळ्या आणि विविध हर्बल उत्पादनांकडे तरुणांचा कल वाढला असला, तरी वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहार उत्पादनांच्या विक्री व वितरणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्याची घोषणा केली आहे.

बाजारात विक्री होणाऱ्या अनेक सप्लिमेंट्सच्या बाबतीत उत्पादनातील घटक आणि जाहिरातींमधील दावे यांच्यात तफावत असल्याचे 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत समोर आले. काही उत्पादनांमध्ये प्रत्यक्षात असलेले घटक आणि विक्रीसाठी वापरले जाणारे दावे वेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, केमिस्ट, जिम आणि हेल्थ सेंटर यांना नव्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकडे FDA चा आवश्यक परवाना असणेही अनिवार्य असेल.

लोणावळ्यातील 4 मोठ्या हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई; ऑर्किड, रिदम, फर्न आणि बेसिलिकाचे परवाने निलंबित

सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर्सकडून प्रोटीन पावडर, वजन कमी करणारी उत्पादने आणि त्वचेवर ग्लो आणणाऱ्या पदार्थांच्या जाहिराती करताना अनेकदा दिशाभूल करणारे दावे केले जातात. अशा जाहिरातींवरही FDA कडून लक्ष ठेवले जाणार असून, चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, लहान बालके, गर्भवती महिला, रुग्ण आणि खेळाडू अशा उत्पादनांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याशिवाय करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हेल्थ सप्लिमेंट्स ही औषधे नसून ती केवळ दैनंदिन आहाराला पूरक आहेत; कोणताही आजार बरा करण्याचा दावा त्यांच्याबाबतीत करता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नव्या नियमांनुसार प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक आणि इतर संबंधित घटकांचा वापर करताना FDA ची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल. नियमांचे उल्लंघन करून उत्पादनांची विक्री, जाहिरात किंवा वितरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. त्यामुळे हेल्थ सप्लिमेंट्सच्या बाजारपेठेतील उत्पादकांपासून ते विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच नियमांचे पालन करावे लागणार आहे. FDA च्या या निर्णयामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनियंत्रित सप्लिमेंट विक्रीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version