दुपारी पुण्यात, आता मुंबईत गोळीबार; माहीममधील सोन्याच्या दुकानावर अज्ञातांकडून फायरिंग

Mahim Firing Incident : पुण्यात न्यायालयाबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुंबईतील माहीममध्ये पी. सी. जैन ज्वेलर्सवर गोळीबार.

News Photo   2026 11 25T213728.213

Mahim Firing Incident

Mahim Firing Incident : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर (Pune) झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच मुंबईतील माहीम परिसरातही गोळीबार झाल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माहीम येथील पी. सी. जैन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानाला लक्ष्य करत अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सोन्याच्या दुकानावर गोळीबार करण्यामागे नेमका काय उद्देश होता, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी दुकानालाच लक्ष्य का केले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, गोळीबाराच्या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची माहिती मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

पुणे कोर्ट गोळीबाराच्या थरारात दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमधून ताब्यात

विशेष म्हणजे, याच दिवशी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 जवळही गोळीबार आणि जीवघेण्या हल्ल्याची घटना घडली होती. कात्रज येथील रहिवासी मंदार किवळे हा न्यायालयातील सुनावणी संपवून बाहेर पडत असताना दुचाकींवरून आलेल्या 6 हल्लेखोरांनी त्याला घेरले. हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. न्यायालयाच्या गेटबाहेर भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती.

या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यात दिवसाढवळ्या न्यायालय परिसरात झालेला हल्ला आणि त्यानंतर मुंबईतील माहीममध्ये सोन्याच्या दुकानावर झालेला गोळीबार या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील दोन प्रमुख शहरांमध्ये एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version